शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आजच्या काळात विवाह सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणात होणारी पैशाची उधळपट्टी,झगमगाट आणि रूढीपरंपरांचे अवास्तव प्रदर्शन असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.
मात्र,या प्रचलित पद्धतीला छेद देत भद्रावती तालुक्यातील वडाळा येथे भरडे आणि हजारे कुटुंबीयांनी विवेक,समता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा प्रेरणादायी विवाह सोहळा घडवून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विवेकी विवाह सोहळ्यात नवदांपत्य रोशन दिलीप हजारे आणि स्नेहा शंकर भरडे यांनी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत ‘मॅजिक डोनेशन बॉक्स’ संकल्पना राबवली.
लग्नसमयी पाहुण्यांकडून दिल्या जाणाऱ्या ओवाळणीची रक्कम या बॉक्समध्ये जमा करण्यात आली.यातून एकूण ३८ हजार ८०७ रुपये जमा झाले असून ही संपूर्ण रक्कम त्यांनी ‘मॅजिक’ या सामाजिक उपक्रमाला मदत म्हणून दिली.
वडाळा गावची वधू स्नेहा हिने बी.एस्सी. अॅग्री पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे,तर खेमजई येथील वर रोशनने एम.एस.डब्ल्यू.पर्यंत शिक्षण घेतले आहे.
विचार आणि मूल्ये जुळल्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय कुटुंबीयांसमोर मांडला.सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय असलेल्या वधूचे वडील शंकर भरडे यांनी मुलीच्या निवडीचा सन्मान करत तिच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले आणि दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने हा विवाह सोहळा पार पडला.
स्वतःच्या मुलीच्या स्वातंत्र्याचा आदर करून वडिलांनी दिलेला हा मान महिला दिनानिमित्त खऱ्या अर्थाने मुलीचा सन्मान ठरला.
या विवाह सोहळ्यात अनेक अवैज्ञानिक आणि रूढीगत प्रथा जाणीवपूर्वक टाळण्यात आल्या. अंतरपाट,स्वस्तिक काढणे,ओंजळीत तांदूळ टाकणे अशा प्रथा बाजूला ठेवून विवेक,समता आणि मानवी मूल्यांवर आधारित विवाह पद्धती स्वीकारण्यात आली.
विशेष म्हणजे या सोहळ्यात आदिवासी परंपरेतील मंगलाष्टकांचा समावेश करण्यात आला.निसर्ग,परस्पर सन्मान आणि सहजीवनाचे मूल्य व्यक्त करणाऱ्या या मंगलाष्टकांमुळे विवाहाला स्थानिक संस्कृतीचा आत्मीय स्पर्श लाभला.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा विवाह पूर्णपणे हुंडामुक्त होता.
विवाह हा व्यवहार नसून दोन कुटुंबांमधील सन्मानाचे नाते आहे,हा संदेश या कृतीतून देण्यात आला.समाजात अजूनही अस्तित्वात असलेल्या हुंडा प्रथेच्या विरोधात हा ठाम आणि प्रेरणादायी संदेश ठरला.
दिखाऊ परंपरांना फाटा देत या विवाहात बँड-बाजा,भव्य मिरवणूक यांसारख्या खर्चिक गोष्टी टाळण्यात आल्या.
त्याऐवजी समतेवर आधारित लोकगीत आणि लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करून उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले.तसेच वडाळा आणि खेमजई गावातील वाचनालयांना आर्थिक मदत करण्याचा संकल्पही दोन्ही कुटुंबीयांनी व्यक्त केला.
भरडे आणि हजारे कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा विवेकी विवाह सोहळा केवळ कौटुंबिक आनंदाचा क्षण न ठरता समता,विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे.
नवदांपत्य स्नेहा आणि रोशन यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला शुभेच्छा देताना उपस्थितांनी समाजात अशा विवेकी विवाह पद्धती अधिक प्रमाणात रूढ व्हाव्यात,अशी अपेक्षा व्यक्त केली.



