Home देशविदेश शोषण,समस्या आणि दुःख…

शोषण,समस्या आणि दुःख…

      माणसाच्या जीवनात दुःख निर्माण झाले की, तो सुख शांती समाधान आनंदाला पारखा होतो,म्हणजे ज्या गोष्टीसाठी माणूस सतत धडपडत असतो,त्याच गोष्टी त्यास मिळत नाहीत.आणि माणसाची खरी गरज तर आनंद सुख शांती समाधान हीच आहे.या चार जीवनदायी गरजा मिळत नाहीत,त्याचे कारण दुःख हे आहे,दुःखाचे मूळ कारण बुद्धाने सांगितले मोह माया अभिलाषा आततायीपणा,अतिरेकीपण. जीवन जगण्यास आवश्यक असलेल्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याचा स्वार्थ गैर नाही,पण हे मिळाल्या नंतरही अधिक सुख आणि अधिक चैनीच्या गरजांसाठी प्रयत्न करणे म्हणजे लोभ होय.तो सोडला पाहिजे.आणि नाही सोडला तर शारीरिक सुख चैन ची पूर्तता होईल,पण यातून शांती समाधान मिळणे ऐवजी माणूस अधिकाधिक बेचैन होऊन,त्याचे मानसिक संतुलन बिघडेल.आणि जीवनात ज्याचे मानसिक संतुलन बिघडते तो वेडा होतो. वेडा याचा अर्थ त्यास काहीच न कळणे होय.

    दुःखाचे मूळ कारण मार्क्सने पण सांगितले आहे,ते म्हणजे शोषण. जेंव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाचे शोषण करतो,एक जात दुसऱ्या जातीचे शोषण करते,एक धर्म दुसऱ्या धर्माचे शोषण करते,एक परिवार,घराणे इतर घराण्यांचे शोषण करते,तेंव्हा शोषणाच्या या संबंधात शोषक आणि शोषित असे दोन पक्ष किंवा दोन बाजू निर्माण होतात,शोषक आणि शोषित या दोन बाजू.अर्थात हे दोन वर्ग जे एकमेकांचे शोषण करणे याच उद्देशाने प्रेरित होऊन कार्य करतात,तेंव्हा आर्थिक,सामाजिक,राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक शोषण करणारी विषमतावादी व्यवस्था निर्माण होते,आणि या व्यवस्थेचे संरक्षण करणारे पक्ष आणि सरकार,सत्ता निर्माण होते,यामुळे शोषणाची ही अवस्था,परिस्थिती, क्रम कायम होतो,शोषण हाच या व्यवस्थेचा पाया असतो,या शोषणातूनच आर्थिक,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय,कौटुंबिक समस्या निर्माण होतात,

     शोषणावर आधारित या व्यवस्थेतील विरोधाभास असा की,या व्यवस्थेचे शोषक आणि शोषित असे दोन घटक निर्माण होतात,ते एकमेकांचे शोषण करतात,त्यासाठी संघर्षपण करतात.परंतु ज्या ” शोषण ” या संकल्पनेतून विषमता निर्माण होते,विषमतावादी व्यवस्था निर्माण होते,त्यामुळेच समस्या निर्माण होतात,या दोन घटकात संघर्ष पेटतो,त्याचे परिणाम वाईट असतात,ते दोघांनाही ( शोषक शोषित ) भोगावे लागतात,समस्यांमुळे दुःख पदरी पडते,याची जाणीव होणे,आणि शोषण नसणारी व्यवस्था,म्हणजे शोषण विरहित,म्हणजेच आर्थिक सामाजिक समतेवर आधारित व्यवस्था निर्माण केली पाहिजे,यासाठी कुणी धडपड करताना दिसत नाहीत.

     जातीना,वर्गाना कुरवाळल्याने,जोपासल्याने,धर्मास पोसल्याने ही शोषण आधारित व्यवस्था नष्ट होणार नाही,शोषण थांबणार नाही.केवळ सत्ता बदलल्याने व्यवस्था बदलणार नाही.आणि व्यवस्था बदलल्याशिवाय शोषण बंद होणार नाही,शोषण बंद झाल्याशिवाय समस्या बंद होणार नाहीत,समस्या संपल्याशिवाय ( भौतिक ) ,दुःख संपणार नाही.अर्थात भौतिक समस्या सुटल्या तरी मानसिक समस्या सुटणार नाहीत,याचे कारण पण कुणाला कितीही शोषण करण्याची मुभा संधी असलेली ही विषमतावादी व्यवस्था होय,जिचा पायाच मुळी शोषण आहे,म्हणजेच शोषणावर आधारित ही व्यवस्था आहे.ही मुळातून उखडून फेकली पाहिजे,त्या ठिकाणी शोषण विरहित समतेवर आधारित समाज व्यवस्था,आर्थिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे,असे जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ,समाजशास्त्री,फिलॉसॉफर कार्ल मार्क्स म्हणतो.

    ज्या व्यवस्थेत शोषण करणाऱ्या संधी असते,अशा व्यवस्थेत लोकांना मोह सोडण्याचा कितीही संत उपदेश केला तरीही मुळात नैसर्गिक रित्या स्वार्थी माणूस मोह सोडणार नाही.एकीकडे मोह सोडा म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच्या स्वार्थाला संधी द्यायची,त्यासाठी रान मोकळे करायचे,अशा विचाराने,धोरणाने मोह सुटणे शक्य नाही,यास मानवी इतिहास साक्षी आहे,अनुभव आहे.

   सारांश हा की,दुःखाचे कारण समस्या,समस्याचे कारण मोह,मोहाचे कारण शोषण,शोषणाचे कारण विषमता,विषमतेचे कारण व्यवस्था होय. ती बदलल्या शिवाय गरिबांचे,मध्यम वर्गीयाचे,श्रीमंतांचे,कोणत्याही जातीच्या ,धर्माच्या माणसाचे दुःख कायमचे नष्ट होणार नाही.

              लेखक

              दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 9 मार्च 2026,फोन : 9420912209.