Home Social अखेर आमदार मसरामांच्या पाठपुराव्याला यश,आता कुरखेडा व कोरची मार्गावरून धावणार नागपूर बस…

अखेर आमदार मसरामांच्या पाठपुराव्याला यश,आता कुरखेडा व कोरची मार्गावरून धावणार नागपूर बस…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         आमदार रामदास मसराम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागणीचा सकारात्मक विचार करून नागपूर-कोरची, कोरची-नागपूर तसेच नागपूर-कुरखेडा, कुरखेडा-नागपूर या बससेवा येत्या,शुक्रवार ६ मार्च पासून कुरखेडा व कोरची मार्गावरून नियमितपणे धावणार असून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचे दिसून येत आहे.यामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

         गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात स्वतंत्र बस डेपो उभारण्यात यावा,तसेच कुरखेडा-नागपूर आणि कोरची-नागपूर बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी,अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली होती.यासंदर्भात बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झूम मीटिंगद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व जिल्हाधिकारी यांच्या अधक्षतेखाली बैठक घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

          सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(MSRTC)अंतर्गत कुरखेडा येथे बस डेपोची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.त्याचबरोबर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नागपूर येथे शिक्षण,आरोग्य व शासकीय कामांसाठी जावे लागते.मात्र,थेट बससेवेअभावी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार मसराम यांनी निदर्शनास आणून दिले होते.

           त्यानुसार,येत्या ६ मार्चपासून नागपूर-कोरची मार्गावरील बस नागपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटून सायंकाळी ६.५० वाजता कोरची येथे पोहोचेल.सदर बस कोरची येथे मुक्कामास राहील.त्यानंतर कोरचीवरून सकाळी ६.३० वाजता सुटून नागपूर येथे १०.३५ वाजता पोहोचेल.

          तसेच नागपूर-कुरखेडा मार्गावरील बस नागपूर येथून पहाटे ५.१५ वाजता सुटून सकाळी ८.२५ वाजता कुरखेडा येथे पोहोचेल.कुरखेडा वरून ही बस सकाळी ९ वाजता सुटून दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

           या बससेवेच्या सुरूवातीमुळे विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रवासाची मोठी अडचण दूर होणार आहे.विशेषतः आरोग्य, शिक्षण आणि शासकीय कामांसाठी नागपूरला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

       या निर्णयाबद्दल नागरिकांनी आमदार मसराम यांचे आभार मानले.