Home देशविदेश उद्योग,शेती आणि यंत्र…

उद्योग,शेती आणि यंत्र…

   ज्वारी गहू मका इत्यादी अन्नधान्य आणि कापूस ऊस सारखे नगदी पिके तसेच तिळ शेंगदाणे सोयाबीन सारखी तेलबिया इत्यादी पिके आपण शेतीतून मिळवतो,

     शेती करण्यासाठी मानवी आणि प्राण्याचे श्रमाचा (मजूर बैल) वापर करतो,श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी किती द्यायची ? हे मालक आणि मजूर दोन्हींच्या आपसी समजुतीनुसार किंवा संघर्षातून ठरत असते.नफा कमावण्यासाठी शेतमालक कमीतकमी मजुरी देण्याचा प्रयत्न करीत असतो,आणि जास्तीत जास्त मजुरी मिळावी म्हणून शेतमजूर मालकाशी झगडा करीत असतो,यातून मजुराची ताकद कमी पडते म्हणून सर्व शेतमजूर संघटित होऊन संघर्ष करतात,मालक पण संघटित ताकद निर्माण करून संघर्ष करतात,संघटित ताकद उग्ररूप धारण करते,त्यातून संघर्ष ,संघर्षातून एल्गार क्रांती होते,शेतमजुरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची जीत होते,मालकांची हार होते,हा संघर्ष टाळण्यासाठी मालक उपाय शोधतात, तो यंत्राचा.यंत्राच्या वापराने दोन हेतू साध्य होतात,मजूर अत्यंत कमी लागतात,म्हणजे फक्त यंत्र चालविण्यासाठीच.शिवाय मजुरी खर्च कमी झाल्याने आणि शिवाय उत्पादन वाढल्याने नफा वाढतो,नफ्यात भर पडते.हा शेतमालकाचा फायदा यंत्र वापरामुळे होतो.परंतु काम करणाऱ्यांचे हात रिकामे राहतात,यामुळे प्रचंड बेकरीचे संकट राष्ट्रापुढे निर्माण होते.

       हे झाले शेतीबाबतीत,असेच कारखाने उद्योग क्षेत्रात पण घडत असते.मुळात यंत्राशिवाय कारखाने चालतच नसतात,परंतु यंत्र चालवण्यासाठी म्हणजेच वस्तु निर्मितीसाठी कामगाराची गरज उद्योगपती,कारखानदारांना असते,इथे पण कामगार आणि मालक यांच्यात संघर्ष पेटतो,कामगारांच्या आणि मालकांच्या संघटना निर्माण होऊन ते पैशासाठी आपापसात भांडत असतात.कामगार सतत संप करतात,त्यामुळे मालकाचे आर्थिक नुकसान होते,हे टाळण्यासाठी शिवाय अधिक नफा कमावण्यासाठी मालकवर्ग हा अधिकाधिक उत्पादन करणारी यंत्र शोधून त्यांचा वापर करीत असतो,त्यामुळे शेती प्रमाणेच याही क्षेत्रात बेकारी चे प्रमाण वाढते.कमीत कमी मजूर आणि जास्तीत जास्त यंत्राचा वापर केल्या जातो.यामुळे राष्ट्रापुढे बेकरीचे दुहेरी संकट निर्माण होते,एक शेतीव्यवसायातील तर दुसरे उद्योगव्यवसायातील बेकरीचे संकट.या संकटातून मार्ग काढण्याचे काम सरकारचे असते.कारण मालक आणि मजूर यांच्यातील दुवा मध्यस्थ हा सरकार असते,परंतु कोणत्याही पक्षाचे सरकार जर मालकाची बाजू घेत असेल तर माकाचाच फायदा होणार,आणि मजुरांची कामगारांची बाजू घेईल तर यांचाच फायदा होणारा असतो.परंतु भांडवलशाहीतील सरकारे हे नेहमीच मालकांचीच बाजू घेतात,कारण आमदार खासदारांना मिळणारा मलिदा हा मालकाकडेच असतो,श्रमिक कष्टकऱ्यांकडे नसतो.म्हणून श्रमिक आणि मालकांच्या लढाईत मालकधारजीन्या शासनाच्या धोरणामुळे स्थानिकांचे नुकसानच होते,मालकाचा फायदाच होतो.भांडवलशाहित्त असे घडते.कारण भांडवली व्यवस्थेत भांडवलदारांचे सरकार असते,म्हणून यास भांडवशाही म्हणतात.भांडवलशाही याचा अर्थ जास्तीत जास्त यंत्राचा वापर करून अधिकाधिक वस्तू उत्पादन ( शेती कारखान्यात ) करणे,अधिकाधिक विक्री करणे आणि अधिकाधिक नफा कमावणे हे ध्येय्य्य भानवलशाही व्यवस्थेचे असते.जनतेची बेकारी,राष्ट्रापुढील संकट याचे सरकारला काहीच देणेघेणे नसते.कारण कायदे धोरण बनवणारे आमदार खासदार मलिदा मिळण्यासाठी भांडवलदार जमीनदारांचे बटिक बनून राहतात.ज्यांच्या बहुमताने निवडून आले त्या अधिक संख्येने असलेल्या शेतकरी मजूर कामगारांना विसरतात,मालक श्रमिकांच्या संघर्षात यांचे पदरी दगड गोटे च टाकतात.

        स्वातंत्र्य लढ्यात बहुसंख्य जनतेनी गांधींचे नेतृत्व स्वीकारले,त्यात शेतकरी ( शेतकरी म्हणजे शेतमालक नव्हे तर शेतीकरणारा शेतमालक आणि शेतमजूर ) आणि श्रमिक यांची संख्या जास्त होती.जमीनदार ,बरेच संस्थानिक तर इंग्रज सरकारचे मंडलिक म्हणून होते.ते आणि पाटील देशमुख,जहागिरदार, बिरादार,सुभेदार हे स्वातंत्र्य लढ्यात नव्हते,तर श्रमिकच गांधीमागे ठामपणे उभे राहिले.म्हणून इंदिरा गांधींनी सीलिंग ऍक्ट आणि बँकांचे राष्ट्रीयकरण करून जमिनीचे वाटप आणि भांडवल वाटप श्रमिकांच्यासाठी केले.

      गांधीचे विचार होते की,स्वप्न होते की,गाव आणि गावकरी स्वावलंबी झाले पाहिजेत,शेतीतील मालावर प्रक्रिया करणारे उद्योग गावातच निर्माण झाले पाहिजेत,गावकऱ्यांच्या गरजा गावातच भागविल्या गेल्या पाहिजेत.अन्नधान्य, कपडा, तेल,सर्वप्रकारची खाद्यपदार्थ गावातच निर्माण झाली पाहिजेत.बाहेरून कमीत कमी आयात आणि जास्तीत जास्त निर्यात हे धोरण स्वीकारले तर गाव स्वावलंबी होईल,” आमच्या गावात आमचेच सरकार,आमच्या गावात आमचेच उद्योग, आणि व्यापार ” हे स्वावलंबी विचार आणि धोरण गांधीजींचे होते,परंतु यासाठी यंत्रांचा कमीत कमी वापर आणि मानवी हातांचा जास्तीत जास्त वापर होणे गरजेचे आहे,मोठमोठी यंत्रे वापरून,मोठमोठे कारखाने काढू नयेत,कारण यामुळे माणसांच्या हाताना काम मिळणार नाही,बेकारी वाढते,म्हणून छोटी छोटी यंत्रांचा वापर शेतीत कारखान्यात करावा,माणसांच्या हाताला काम पाहिजे,यंत्रामुळे ती रिकामे होऊ नयेत,यासाठी अशी यंत्रे निर्माण करावीत की,जे यंत्र उत्पादन तर वाढवेल,दुप्पट करील,परंतु त्याने हाताला पण काम दिले पाहिजे.म्हणजे हाताला काम नाही अशी यंत्रच निर्माण करू नये.तरच बेकरीचा हा राक्षस देशापुढे आ वासून उभे राहणार नाही.असे गांधीजींचे धोरण व विचार होते, हे भांडवलदारांना खटकले,म्हणून त्यांनी त्यांचा खून केला,नथुरामच्या हातात बंदूक देऊन.

   या लेखाचा हेतू हा की,भांडवलशाही व्यवस्था असल्यामुळे मोठमोठी यंत्रे अधिकाधिक उत्पादन त्यातून फायदा नफा यासाठी प्रयत्न मालकवर्ग करीत असतो.सरकार श्रमिकांच्या ( शेतकरी कामगार शेतमजूर ) बहुमतावर निवडून येऊनही मलिदा खाण्यासाठी मालकांचीच बाजू घेते,त्यांच्याच हिताचे कायदे धोरण आख ते.पोलिस मिल्ट्रीचा वापर त्यांची जीवितहानी आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून संरक्षण देते.परंतु समाजवादी किंवा साम्यवादी व्यवस्था जर आणली,तर या व्यवस्थेतील सरकार हे मालकाऐवजी कष्टकरी श्रमिक मजूर कामगार सुशिक्षित अशिक्षित बेकार यांच्याच बाजूचे कायदे करेल धोरण आखेल, मोठमोठी अवजड यंत्रांचा वापर न करता कारखाने आणि शेतीत छोटी छोटी यंत्र निर्मिती आणि वापर करणे भाग पडेल,मोठमोठ्या कारखाना ऐवजी गावोगावी शेतमाल प्रक्रिया उद्योग काढून प्रत्येक माणसाला आणि त्याच्या प्रत्येक हाताला काम देण्याचे काम सरकार करेल.यासाठी भांडवली जमीनदारी व्यवस्थे ऐवजी समाजवादी साम्यवादी व्यवस्था स्थापन करावी लागेल.हाच एक उपाय बेकरीवरचा आहे.

      100 टक्के खाजगीकरणाचे धोरण स्वीकारले तर शेतकऱ्यांच्या जमिनी पण भांडवलदारांच्या ताब्यात जातील,जमीनदारी संपुष्टात येईलच,ती आलीच पाहिजे,परंतु छोटे मध्यम शेतकरी पण भूमिहीन होतील.शेतमजूर कामगार यांची बेकारी,अधिकाधिक वाढेल.सरकारी नोकऱ्या,आरक्षण बंद होईल.केवळ 25 टक्के लोकसंख्याच कामगार म्हणून राहील,आणि 75 टक्के लोकसंख्या बेकार आणि भिकार होईल,5 किलो धान्य,आणि लाडकी बहीण म्हणूनच गुजारा करावा लागेल.

  यंत्र सरकार श्रमिक या तीन घटकांचा विचार आणि त्यांचे संबंध या बद्दल अजून गहन चिंतन वाचकांनी करावे,ही अपेक्षा.

             लेखक

            दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                 फोन : 9420912209