शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील सावरी आणि माकोना परिसरातील प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन,रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिमूर आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची आणि केलेल्या आंदोलनात्मक पवित्र्याची दखल घेत,चिमूर आगाराने आजपासून चिमूर ते माकोना ही बस सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे.
चिमूर ते माकोना या मार्गावर बस सेवा नसल्याने विद्यार्थी,नोकरदार आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन रिपब्लिकन सेनेचे चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी आगार व्यवस्थापकांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
आज जेव्हा या मार्गावर पहिली बस धावली,तेव्हा सावरी आणि माकोना परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.रिपब्लिकन सेनेच्या या यशस्वी लढ्यामुळे आणि जगदीश मेश्राम यांच्या तत्परतेमुळे ही बस सेवा सुरू झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
बस सेवा सुरू झाल्याबद्दल सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सावरी आणि माकोना येथील सर्व ग्रामस्थांनी जगदीश मेश्राम आणि रिपब्लिकन सेनेचे जाहीर आभार मानले आहेत.
“ही बस सेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे,”अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत.
बाॅक्स…
“जनतेच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन सेना सदैव तत्पर आहे.चिमूर-माकोना बस सेवा हे केवळ एक पाऊल असून,तालुक्यातील इतरही प्रलंबित प्रश्नांसाठी आमचा लढा सुरूच राहील.”



