शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भिवापूर :- चिखली ते भिवापूर रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या मागणीसाठी चिखली येथे सुरू असलेले बेमुदत उपोषणाची अखेर उपविभागीय अधिकारी चव्हाण यांच्या मध्यस्थीने गुरुवारी सांगता करण्यात आली.
उपोषणकर्त्यांना रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चिखली ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश फुलबांधे यांच्या नेतृत्वाखाली १७ मेपासून हे बेमुदत उपोषण सुरू होते.चिखली-भिवापूर मार्गाची झालेली दुरवस्था,नागरिकांना होणारा त्रास आणि वारंवार पाठपुरावा करूनही कामास विलंब होत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता.
गुरुवारला दुपारी उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली.प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी गंगाधर रेवतकर,तहसीलदार संजय राठोड,गटविकास अधिकारी चेतन जाधव,ठाणेदार रवींद्र मस्कर,शिवसेना श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवक कैलास भाऊ कोम्मलीवार,युवासेना उपजिल्हा प्रमुख वैभव ठाकरे चिमुर,उपविभाग प्रमुख समीर बल्की,प्रीतीताई दिडमुठे उप सरपंच साठगाव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी विधापरिषद निवडणूकिची आचारसंहिता संपल्यानंतर चिखली-भिवापूर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
तसेच कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि ग्रामपंचायत सदस्यांची संयुक्त समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान चव्हाण यांच्या आश्वासणानंतर आंदोलन समाप्तीची घोषणा करण्यात आली.



