ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जमनापूर/साकोली येथे तीन दिवसीय ‘ज्ञानरंग’ वार्षिकोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. एल. पी. नागपूरकर, संचालक – ERWICA फाऊंडेशन हे विराजमान होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर, शारीरिक निर्देशक, राजीव गांधी महाविद्यालय, सडक/अर्जुनी यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. मनीषा चव्हाण, सहायक वनसंरक्षक, नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प, साकोली उपस्थित होत्या. तसेच शामरावजी नवखरे व देवचंदजी करंजेकर, संस्थेचे विश्वस्थ, विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापक श्री. विनोद किरपान, शाळेच्या प्राचार्या सौ. भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी श्री. सतिश गोटेफोडे तसेच पर्यवेक्षिका सौ. वंदना घोडीचोर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या सौ.भारती व्यास यांनी मंचावरील सर्व मान्यवरांचा परिचय करून देत त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधून मार्गक्रमण करून आपले ध्येय साध्य करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी शाळा व्यवस्थापक श्री. विनोद किरपान यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक व शैक्षणिक सुविधा संस्था गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने उपलब्ध करून देत आहे. त्यामुळेच नवजीवनचा विद्यार्थी आजच्या स्पर्धात्मक युगात कुठेही मागे पडत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एल. पी. नागपूरकर यांनी मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा उल्लेख करून युवकांना प्रेरणा देणारे, मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला असल्याचे सांगितले. असेच दर्जेदार व प्रेरणादायी शिक्षण ही संस्था भविष्यातही देत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मंचावरील अध्यक्ष, प्रमुख अतिथी व विशेष अतिथींनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक व नैतिक विकासासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात (गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व आर्ट क्राफ्ट) विद्यार्थ्यांनी सादर केलेली आकर्षक व कल्पक मॉडेल्स विशेष लक्षवेधी ठरली.
यासोबतच पुष्पगुच्छ सजावट, डिश डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, सामूहिक नृत्य, नक्कल, एकांकिका, गीतगायन, वेशभूषा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला उत्तम वाव मिळाला.
या वार्षिकोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जमनापूर/साकोली येथील समस्त शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



