Home Maharashtra “जेसीबी द्वारा नाली उपसा, पूल उध्वस्त, गटारातील साचलेले सांडपाणी: डासांच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशांना...

“जेसीबी द्वारा नाली उपसा, पूल उध्वस्त, गटारातील साचलेले सांडपाणी: डासांच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशांना धोका.” ग्रामपंचायत कोठारी चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. — वन विभागाची परवानगी न घेता मोठमोठ्या झाडांची जेसीबी द्वारा तोडफोड, ग्रा.पं. कोठारी चा अफलातून कारभार…

     विवेक रामटेके

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी 

        कोठारी – चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी हे तालुक्याच्या दर्जाचे गाव तसेच मोठी बाजारपेठ. मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मोठे गाव. ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व जनप्रतिनिधी यांना जणू अधिकार व सत्तेच्या माज आल्याची जाणीव आता जनतेला होत आहे.

        असाच काहीसा प्रकार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाली उपसा प्रकरणात घडला आहे.

       कोठारी – काटवली मुख्य मार्गावर विविध कार्यकारी सहकारी संस्था पुढील नालीचे जेसीबी द्वारा उपसा करून नालीवरील व्यापारी चाळीतील दुकानाकडे ये- जा करण्याचे प्रत्येक दुकाना पुढील पुल तोडण्यात आले. सदर उपसा व तोडफोड ग्रामपंचायत चे वरिष्ठ लिपिक श्री सुरेश कंदीकट्टीवार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आले. नालीच्या सांडपाण्याचा निचरा होत नसताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत त्याच नालीला जुळलेली मोठी नाली जेसीबी द्वारा उपसा करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नालीत सांडपाणी साचून राहते आहे. त्या नालीतील साचलेल्या सांडपाण्यात डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून डासांच्या प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांचे तसेच व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबतीत विचारणा केली असता लगेच पुलाचे काम सुरू करण्यात येईल असे ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक श्री. सुरेश कंदीकट्टीवार यांनी आश्वासन दिले.

       कोठारी-काटवली मार्गावरील विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालयापुढे पूल असून सदर पुलाची नाली खोल आहे तर त्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट बांधकाम करत असताना सदर पुलाचे बाजूला दुसरी नाली बनवण्यात आली परंतु ती नाली पुलाखालील नालीपेक्षा अंदाजे दोन फूट उंच असल्यामुळे त्या नालीला जुळलेल्या सगळ्या नालींचे सांडपाणी व्यापारी चाळी पुढील नालीत साचून राहते व त्या सांडपाण्याचा निचरा होत नाही तसेच जी नाली नव्याने बनवण्यात आली आहे ती नाली मुख्य नालीपासून उंच केली गेली असल्यामुळे सदर सांडपाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे त्या भागातील जनतेने बनवण्यात आलेल्या नवीन नालीला बोगदा करून त्या नालीचे सांडपाणी दुसरीकडे वळवले होते. काही महिन्यात उपसरपंच श्री. सुनील फरकडे यांच्या द्वारा सदर नालीलागतच्या रस्त्याला जुळलेल्या बाजूच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रेट बांधकाम करण्यात आले. त्या रस्त्याला इंग्रज काळापासून एक नाली होती. परंतु ते बांधकाम करत असताना त्या नालीचे ठिकाणी नाली खोदकाम न करता उलट तो नालीचा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात त्या रस्त्यावरून नालीचे पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद होतो.

सांडपाण्याचा निचरा होण्याचे सगळे मार्ग बंद (चोक अप) असून सुद्धा ग्रा.पं. प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

        सदर नाली कोठारी – काटवली मार्गावरील आठवडी बाजार भागातील मोठी नाली असून त्या नालीला अनेक लहान जुळलेल्या आहेत. गावातील अनेक लहान नाल्यांचे सांडपाणी सदर नालीत जमा होते. परंतु या नालीचे सांडपाण्याचा निचरा होण्याचे सर्व मार्ग अनेक वर्षापासून बंद (चोक अप) आहेत. असे असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन या नालीच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही ही शोकाची बाब आहे.

      कोठारी – काटवली मार्गावरील पूलाचे नाली व सांडपाण्याचा निचरा न होणे संबंधी समस्या तसेच व्यापारी चाळी पुढील नाली वरील पूलाची समस्या सोडवून त्यावर योग्य उपायोजना करण्यासंबंधी ग्रामपंचायतला व्यापाऱ्यांद्वारा जानेवारी महिन्यात अर्ज करण्यात आला होता परंतु अजून पर्यंत त्यावर कोणतीही उपाययोजना केली गेली नाही.  

व्यापाऱ्यांद्वारा दिलेल्या अर्जासंबंधी कोणतीही माहिती नसल्याचे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांचे उत्तर.

        जानेवारी २०२५ मध्ये वि.का.स.संस्था चाळीतील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदर समस्या व त्याचे उपाययोनांबाबत अर्ज केला होता. त्या अर्जासंबंधी विचारणा केली असता अर्जाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे ग्रा.पं. सरपंच सौ. अश्विनी वासमवार, उपसरपंच श्री. सुनील फरकडे, ग्रामसेवक श्री. अभय अ. धवणे यांनी उत्तर दिले तर ग्रामसेवकांनी रिसीव्ह कॉपीची झेरॉक्स प्रत ची मागणी केली. त्यानंतरही आजपर्यंत सदर समस्येच्या उपाययोजनेसाठी कोणतेही प्रयत्न ग्रा. पं. कार्यालया द्वारा केलेले नाही.

     यावरून असा निष्कर्ष निघतो की जानेवारी पासून आजवर ग्रा.पं. च्या मासिक सभेत सदर अर्ज वरिष्ठ लिपिक श्री. सुरेश कंदीकट्टीवार यांचे द्वारा वाचण्यात आला नसावा अथवा ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी कर्मचारी व जनप्रतिनिधी हे सदर समस्येच्या उपाययोजना/निवारण करण्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

वन विभागाकडून झाडे तोडण्याची परवानगी न घेताच जेसीबी द्वारे झाडे तोडल्याची कबुली.

      जेसीबी द्वारे नाली उपसा करत असताना नालीचे काठाने असलेली मोठी झाडे जेसीबी द्वारे तोडण्यात आली. झाडे तोडण्या संबंधी विचारणा केली असता वन विभागाकडून परवानगी न घेता व ग्रा.पं. अधिकारी व सरपंच/उपसरपंच तसेच सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता वरिष्ठ लिपिक श्री. सुरेश कंदीकट्टीवार यांनी वेळेवर स्वतःच स्वेच्छेने निर्णय घेऊन झाडे तोडल्याची कबुली सरपंच सौ. अश्विनी वासमवार, उपसरपंच श्री. सुनील फरकडे व ग्रामसेवक श्री. अभय धवणे यांनी दिली.

अर्ज करून चार महिने लोटून सुद्धा ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

     अर्ज करून चार महिने लोटून सुद्धा नाली वरील पुल बनऊन दिलेले नाही अथवा नालीचे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. सदर समस्येच्या उपाययोजनेबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

      ग्रा. पं. प्रशासनाची अशा प्रकारची वागणूक कायमची झाल्याने ग्रा. पं. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व जनप्रतिनिधी यांना अधिकार व सत्तेचा माज आला आहे अशी चर्चा चौकाचौकात सुरू आहे.

      ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या अशा वागणुकिमुळे ग्रा.पं. कार्यालयातील जनप्रतिनिधी हे विकासपुरुष मान. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकार्यातील काटे असल्याची प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.