धारणीतून स्पेशल -सिक्स गजाआड… — स्वत:ला क्राईम ब्रांच अधीकारी सांगुन नागरीकांची लुटपाट.. — ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची धडक कारवाई…

दखल न्युज भारत

मेळघाट प्रतिनिधी

अबोदनगो चव्हाण

7588228688

 

धारणी मेळघाट मध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी स्पेशल-26 नामक चित्रपट प्रकाशित झाले होते.ज्यामध्ये 26 जणांची एक टोळी स्वतःला इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी संबोधून मोठ्या श्रीमंत लोकांची फसवणूक करून लूटपाट करायचे.

           अशाच प्रकारची स्पेशल-सिक्सची एक टोळी काल सायंकाळच्या सुमारास धारणी शहरात स्वतःला क्राईम ब्राँच अधिकारी संबोधून लूटपाट करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर धारणी पोलिसांकडून धडक कारवाई करत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

           प्राप्त माहितीनुसार दुर्गेश गेंदालाल दारशिंबे वय २५ वर्ष हे हल्ली मुक्काम रामप्रसाद गुप्ता यांच्या शेतात कुसुमकोट येथे राहात असून ते धारणे येथे पायदळ काही किराणा सामान घेण्याकरिता आले असता धारणी शहरातील मधुवा नाल्याजवळ आरोपी नामे योगेश शेषराव मोहिते रा. तळेगाव दांभेरी ता. मोर्शी,तसंव्वर खान वल्द मुस्तफा रा. रिद्धपूर ता.मोर्शी, इमरान अली वल्द इमामअली रा.रिद्धपूर ता. मोर्शी, मुजीबुल वल्द अब्दुलहक रा. रिद्धपूर ता. मोर्शी, जाकिर अली वल्द जमीलशहा रा. रिद्धपूर ता.मोर्शी, पंकज लालसिंग पुणीया रिद्धपूर ता. मोर्शी यांनी दुर्गेश आणि त्याच्या चुलत भावाला आम्ही क्राइम ब्रांच अधिकारी आहोत आम्ही अवैध दारू आणि गुटखा संबंधीत कारवाई करण्याकरिता आलो आहे,असे सांगून त्यांच्या जवळील दीड हजार रुपये नगद आणि एक जिओ मोबाइल हिसकावून घेतला.

          यानंतर दुर्गेश आणि त्याच्या भावाने आरडाओरडा केल्यावर जवळील नागरिक जमा झाले व या स्पेशल-सिक्स आरोपींचा भंडाफोड झाला.नागरिकांनी तात्काळ धारणी पोलीस स्टेशनला प्रकरणाची माहिती दिली असता धारणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वात आरोपींचा पाठलाग करून कुसुमकोट गावाजवळ त्यांच्या मस्क्या आवळल्या.

       घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 499/ 23 कलम 395 भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

       सदर कारवाई पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रीना सदर, पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धारणी पोलिसाच्या तात्काळ केलेल्या उल्लेखनीय कारवाईमुळे स्पेशल-सिक्सद्वारे होणारी लुटमारी टळली.