दारूविक्री कराल तर प्रमाणपत्र/दाखल्यांना मुकाल… — जांभूळखेडाच्या तंटामुक्त गाव समितीचा निर्धार, बजावली नोटीस.. 

सुरज मेश्राम

तालुका प्रतिनिधी 

           कुरखेडा : तालुक्यातील जांभूळखेडा हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी तंटामुक्त गाव समिती आणि महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने गावातील दारूविक्रेत्यांना घरी जाऊन ग्रामपंचायत पदअधिकारी यांनी नोटीस बजावून विक्रेत्यांकडून १५ लीटर मोहफुलाची दारू नष्ट केली आहे. जांभूळखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे तंटामुक्ती समिती, गावकरी व मुक्तिपथ यांच्या संयुक्त विद्यमाने दारूबंदी सभा पार पडली.

          सभेत दारूविक्रेत्यांनी दारूविक्री केल्यास २५ हजार रुपयांचा दंड, सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रमाणापत्र/कागदपत्रे व तलाठी कार्यालयातील मिळणारी कागदपत्रे बंद व शासकीय योजनांपासून वंचित, दंड न भरल्यास स्थावर मालमत्ता पोलिस पाटलांच्या उपस्थितीत जप्त करण्याचे ठरले व समितीने तसा ठराव घेतला.

        त्याच वेळी समितीद्वारे नोटीस काढून समिती व गावकऱ्यांच्या माध्यमातून १६ दारूविक्रेत्यांना त्यांच्या घरी जाऊन नोटीस देऊन दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली. सोबतच विक्री केल्यास समितीने ठरवलेल्या नियमांना सामोरे जाण्याचे त्यांना सांगण्यात आले.

         एका घरून समितीद्वारे १५ लीटर मोहफुलाची/मोहाची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक बनसोड, सरपंच राजबत्ती नैताम, पोलिस पाटील हिरालाल नंदेश्वर, तंटामुक्ती समिती सदस्य तसेच महिला उपस्थित होत्या.