लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं मानवतावादी अधिक होते : डॉ.श्रीपाल सबनीस 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : “बहुसांस्कृतिक एकतेचे प्रतिक म्हणजे अण्णा भाऊ साठे होय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी होते की आंबेडकरवादी होते, ह्यावर आजही वादविवाद होत आहेत. परंतु माझ्या मते, ते मार्क्सवादी तर होतेच. शिवाय आंबेडकरवादीही होते. मात्र ते खऱ्या अर्थानं मानवतावादी अधिक होते अशा आशयाचे उद्गार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस ह्यांनी काढले.

            आळंदी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन, झोपडपट्टी सुरक्षा दल व सकल मातंग समाज आळंदी आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस म्हणून बोलत होते.

            यावेळी माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर, दादासाहेब सोनवणे, अशोक लोखंडे, धनंजय भिसे, संदीपान झोबांडे, नानासाहेब साठे, सुरेश झोबांडे, डॉ.सुनील वाघमारे, राहुल चव्हाण, मंगलताई वेळकर, रुक्मिणी कांबळे, रवींद्र रंधवे, शुभम वेळकर, सुर्यकांत खुडे, विनोद कांबळे, मंगल हुंडारे, संगीताताई फफाळ, सदाशिव कांबळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

             लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले तदनंतर मुख्य सभेला सुरुवात झाली यावेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपल सबनीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रात्री महाराष्ट्राची महागायिका कोमलताई पाटोळे यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महीला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.