कामगार दिन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान…

१ मे हा दिवस आपण ‘महाराष्ट्र दिन’ आणि कामगार दिन म्हणून साजरा करीत असतो. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणतात, ‘ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे. ‘कष्टकरी’ हा शब्दच श्रमिकांचे महत्त्व सांगून जातो.मग तो शेतात राबणारा श्रमिक असो किंवा कारखान्यात काम करणारा श्रमिक असो.तेथे कामगार ,मालक आणि भांडवलदार पात्र बघायला मिळतात.ही तिनही पात्रे माणूस नावाचा प्राणी निभावत असतो.पण न्याय वेगवेगळा असतो. यामध्ये श्रमिक किंवा कामगार यास असमानतेची वागणूक देताना बघायला मिळते. त्याला मिळणारा मोबदला आणि त्याचे श्रम हे प्रमाणात नसते. तो यंत्र म्हणून मालक त्यास राबवून घेत असतो.

            याच अन्यायास वाचा फोडणारा दाता कैवारी कामगारांच्या जीवनात आला आणि त्यांचे जीवन सुवर्णमय केले.या महामानवाचे नाव आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. आजचा कामगार किंवा कष्टकरी वर्ग जो सुखासमाधानात जगताना दिसतो त्याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते, हे तेवढेच सत्य आहे.

डॉ.बाबासाहेब यांचे कामगारांच्या योगदानाविषयी पहायचे झाले तर थोडक्यात त्यांचे कार्य जाणून घ्यावे लागेल.

             २० जानेवारी १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळी त्यांच्याकडे कामगार खाते सोपविण्यात आले. मुंबईच्या विधान परिषदेचे सदस्य आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य या नात्याने भारतातील कामगार कायद्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. दि.६ व ७ सप्टेंबर १९४३ रोजी नवी दिल्ली येथे कामगार मंत्री म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रभावी भाषणात त्यांनी श्रमिकांचे अन्न,वस्त्र,आणि निवारा, शिक्षण, सांस्कृतीक सुविधा आणि आरोग्य संसाधनांच्या मागण्या स्पष्ट केल्या.

             महत्त्वाचे म्हणजे डॉ.आंबेडकरांनी संविधान लिहताना कामगारांच्या हक्कांचे संरक्षण केले आहे. संविधानाप्रमाणे ‘कामगार’ हा भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत’समवर्ती सूची’ मधील एक विषय आहे.जेथें केंद्र आणि राज्य सरकारे दोन्ही केंद्रे सरकारासाठी काही बाबींच्या आरक्षणासाठी कायदा करण्यास सक्षम आहेत.हे नमूद केले आहे.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ आँगस्ट १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला.’टाईम्स आँफ इंडिया’मध्ये त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.१७ मार्च १९३८मध्ये मुंबईच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत डॉ.बाबासाहेब म्हणाले,’गरिबांचा पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे.’सामाजिक अन्याय, अत्याचार विरुद्ध, आर्थिक विषमते विरुद्ध,कामगारांनी लढा दिला पाहिजे.तेव्हाच कामगारांच्या बळावरच कामगारांचे प्रश्न सुटतील. परावलंबी असण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे असा त्यांनी कामगारांना संदेश दिला.१५ सप्टेंबर १९३८च्या ट्रेंड डिस्प्यूट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. डॉ.आंबेडकराच्या मताशी सहमती दर्शवून जमनादास मेथाने डिस्प्यूट बिलाचा विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर १९३८ ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला होता. जमनादास मेहतांच्या अध्यक्षेतेखाली श्रीपाद डांगे, परूळेकर, मिरजकर इत्यादी नेत्यांनी व डॉ.आंबेडकर यांनी संप यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलीस बळाचा वापर केला.त्यात ७२ कामगार जखमी झाले. तर ३५ कामगारांना अटक झाली. पण संप यशस्वी झाला.कामगार संघटनेचा विजय झाला.स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला.स्वतंत्र मजूर पक्षाने गरिब कामगार आणि शेतकरीयांच्या कल्याणाच्या गरजेवर भर दिला.

            खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना जणू काही कामगारांच्या जीवनात नवा सूर्य अवतरला, असेच झाले. 

            त्यांनी विविध कामगार उपयोगी कायदे निर्माण केले. आणि हे कायदे फक्त दलित कामगारांसाठी नव्हते, तर तमाम सर्व भारतीय कामगारांसाठी होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

 ते थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येतील.

१) कोणताही लिंग भेद न करता स्त्री पुरुषास समान कामास वेतन द्यावे.

२) पूर्वी कामगारांना सतत १२ते १४ तास काम करावे लागत होते. आता त्याची मर्यादा ८ तासावर आणली,तरजादा काम केल्यास अतिरिक्त कामाचा दुप्पट मोबदला मिळणे.

३) एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना.

४) कामगार विमा योजना.

५) कामगार कल्याण योजना (लेबर वेलफेअर).

६) भविष्य निर्वाहनिधी कायदा.

७) भारतीय श्रम संघ अधिनियमाची सुधारणा करून कामगार संघटनाना अनेक अधिकार दिलेत.

८) किमान वेतन कायदा (Minimum Wages Act).

९) महिला कामगारांना बाळंतपणाची रजा (Maternity Benefit Act).

१०) कामगारांना/कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा.

११) महागाई भत्ता (D.A.).

१२) कोल अँड मेकामाईन्स प्रोव्हिडन्ट फंड.

१३) त्रिपक्षीय समितीकडून औद्योगिक विवाद समेट घडवून आणण्यासाठी कार्यवाही कशी असावी, याबाबत औद्योगिक संबंध अधिनियम तरतुद.

१४) टेक्निकल ट्रेनिंग स्किम द्वारे कुशल कामगार प्रशिक्षण.

१५) कामगारांना राहण्याची सोय व्हावी यासाठी लेबर कँम्पची योजना.

१६) कामगारांच्या नुकसानभरपाई नियमात सुधारणा.

१७) औद्योगिक स्थायी आदेश सुधारणा.

१८) बोनस योजना इत्यादी होय.

१९) शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी विधीमंडळात मागणी केली.

२०) १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बील मांडले.

२१) १९३८ साली कोकणातील औद्योगिक कलह विधेयकानुसार कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला. पण डॉ.बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करताना संप हा दिवाणी अपराध आहे,फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला.

२२) १९३८मध्ये ‘सावकारी नियंत्रण’ विधेयक सादर केले.

२३)बिडी कामगारांना न्याय मिळण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.

          अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कामगारांना त्यांची सुस्थिती बनविण्यासाठी दिलेले योगदान बहुमोल आहे.

        यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महानता लक्षात येते.म्हणून या दिनी एकच संकल्प करुया डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेवू,म्हणजे संविधान समजेल आणि आमचे हक्क आमचे अधिकार आणि कर्तव्य समजतील.भारताची लोकशाही अधिक मजबूत होईल.

आज दिनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा…

                बाबुराव पाईकराव

                         डोंगरकडा

                          ९६६५७११५१४