Home Maharashtra वरूडच्या गजानन नगर हत्याकांडात आरोपीस जन्मठेप; सत्र न्यायालयाचा निर्णय…

वरूडच्या गजानन नगर हत्याकांडात आरोपीस जन्मठेप; सत्र न्यायालयाचा निर्णय…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

       दखल न्युज भारत

अमरावती :- वरूडच्या गजानन नगरमध्ये पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५, एस. पी. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दत्तापुर पोलिस ठाण्याने दाखल केलेल्या हत्या प्रकरणात आरोपी दिनेश सुधाकर खेडकर (वय ३६, रा. अंजनशिंगी, ता. धामनगाव रेल्वे) दोषी ठरला.

         घटनेनुसार, आरोपी दिनेश खेडकर याची पत्नी सविता ही सततच्या मारहाणीला कंटाळून तीन वर्षांच्या मुलासह घर सोडून फिर्यादी गणेश आनंदराव गोठाणे यांच्या जुनाधामणगाव येथील वीटभट्टीवर राहत होती. घटनेच्या दिवशी, ८ मार्च २०२२ रोजी आरोपी तिचा शोध घेत अचानक वीटभट्टीवर पोहोचला. तेव्हा सविता ही आपल्या खोलीत मुलासह विश्रांती घेत होती. आरोपी थेट खोलीकडे गेला आणि काही वेळातच सविताच्या ओरडण्याचे आवाज बाहेर काम करणाऱ्या महिलांना ऐकू आले.

        त्यातील एका महिलेनं खोलीकडे धाव घेतली असता तिने आरोपीला सवितावर चाकूने वार करताना पाहिले. सविताच्या पोटात मोठी जखम झालेली होती. सदर मजुर महिलेला पाहताच मदतीसाठी मृतक सविता ही खोली बाहेर पळत आली. मात्र आरोपी तिच्या मागोमाग चाकू घेऊन धावत आला. वीटभट्टीवरील निंबाच्या झाडाखाली त्याने तिच्यावर सलग वार करत तिला जागेवरच ठार केले. हा संपूर्ण प्रकार इतर मजुरांसह सविताचा तीन वर्षांचा मुलगाही पाहत होता.

       घटनेनंतर मजुरांनी वीटभट्टी मालक गणेश गोठाणे यांना फोनद्वारे माहिती दिली. ते घटनास्थळी धावत पोहोचले आणि त्वरित दत्तापुर पोलिस स्टेशनला कळवून फिर्याद नोंदवली. तपास अधिकारी स.पो.नि. प्रियंका चौधरी यांनी पुढील तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

       या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी चार साक्षीदार प्रत्यक्षदर्शी होते आणि त्यांनी आरोपीची ओळख पटवली होती. साक्षी, जाबजबाब, तसेच तोंडी आणि लेखी पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे ठरवले.

         न्यायालयाने आरोपी दिनेश खेडकर यास भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा तसेच दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सत्रवाद क्रमांक १९६/२०२२ मध्ये मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी हा निकाल देण्यात आला.

       सरकार पक्षाचा पक्षकार म्हणून सहायक सरकारी वकील तथा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सौ. सोनाली क्षिरसागर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तपास अधिकारी प्रियंका चौधरी, महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना डांगे आणि कोर्ट पेहरवी दिलीप सावरकर यांनी या प्रकरणात सहकार्य केले.