बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
निरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील सध्या ग्रामीण भागात जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढली असून, हा चारा अधिक पौष्टिक आणि पचण्यास सोपा व्हावा यासाठी शेतकरी यांत्रिक कुट्टी मशीनचा वापर करताना दिसत आहेत. पारंपरिक हाताने चारा कापण्याच्या पद्धतीपेक्षा मशीनद्वारे कुट्टी केल्याने वेळेची बचत होत असून श्रमही कमी लागत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी मका, कडवळ, ज्वारी, बाजरी तसेच नेपिअर गवत यांसारखा हिरवा चारा मशीनमध्ये टाकून बारीक तुकडे करत आहेत. या पद्धतीमुळे जनावरांना चारा सहज खाता येतो आणि चाऱ्याची नासाडीही कमी होते. परिणामी दूध उत्पादनात वाढ होण्यास मदतही होत आसल्याचे पशुपालक राहुल शिंदे सांगत आहेत.
पिंपरी बुद्रुक येथील पशुपालक शेतकरी राहुल शिंदे पुढे बोलत असताना म्हणाले की, पूर्वी चारा हाताने कापण्यासाठी मोठा वेळ लागत होता. मात्र आता ट्रॅक्टर किंवा वीजेवर चालणाऱ्या कुट्टी मशीनमुळे काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात चारा तयार होत आहे. त्यामुळे दैनंदिन कामात सुलभता आली असून पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत आहे.
या भागातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हिरवा चारा योग्य प्रकारे कुटून दिल्यास जनावरांचे पचन सुधारते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर करून शेतकरी पशुपालनातही आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.



