डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद म्हणजे माणूसपणाची घेतलेली दखल :- माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी… — डाॅ.राधा संगमनेरकर लिखित ‘झेप यशाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नजरेच्या माध्यमातून होणारा संवाद महत्त्वाचा आहे. डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद म्हणजेच माणूसपणाची घेतलेली दखल आहे. काही डॉक्टर असे असतात की, त्यांच्याकडे पाहिल्यावरच अर्धे आजार बरे होतात. परंतु डॉक्टरांना मारहाणीचे प्रसंग होताना दिसतात. वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण झाले आहे. अनेकदा रुग्णांकडे माणूस म्हणून नाही तर रुग्ण म्हणूनच पाहिले जाते, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

          डॉ.राधा संगमनेरकर लिखित ‘झेप यशाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.रमेश भोसले, डॉ.अमोल अन्नदाते, लेखिका डॉ.राधा संगमनेरकर, डॉ.मुकुंद संगमनेरकर, डॉ.अभिजित अन्नदाते, डॉ.सई संगमनेरकर आदी उपस्थित होते.

         अविनाश धर्माधिकारी म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यात आला आहे. पुस्तकातील अनेक घटना वाचल्यावर हे पुस्तक वेदनादायी परंतु आपले ज्ञान वाढवणारे आहे, असे लक्षात येते. विश्वाची माऊली काय काय सोसून विश्वाला वाढवत असते याची प्रचिती पुस्तकातून येते.

           डॉ. राधा संगमनेरकर म्हणाल्या, ग्रामीण भागात मी काम करत होते प्रत्यक्ष अनुभवासाठी विविध हॉस्पिटलमध्ये काम केले आणि शेवटी आपल्या गावातील लोकांना सेवा मिळावी म्हणून गावी हॉस्पिटल उभारले. पुस्तकी ज्ञानाला व्यवहारात ज्ञानाची जोड मिळेल आणि एक चांगला डॉक्टर होण्यासाठी या पुस्तकातून प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी गीता भुर्के यांनी गणेशवंदना सादर केली. डॉ.श्याम भुर्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ मुकुंद संगमनेरकर यांनी आभार मानले.