महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा… — शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत केली मागणी…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेत राज्यपालांना राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी केली.

खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे सदर घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोरे येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सदर प्रकरणी आपण उच्च स्तरिय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत,अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपाल यांना दिले.

खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानीत करण्याचा कार्यक्रमात 

उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा नाहक जीव गेला, मात्र सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झाली नाही. 

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आला, मात्र कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सदर घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलीसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. 

तसेच सदर घटनेबाबत आजच सरकारशी बोलून पावलं उचलण्याच अभिवचन राज्यपाल यांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आ.सचिन अहिर, आ.सुनील प्रभू, आ.रवींद्र वायकर, आ.मनीषा कायंदे, आ.रमेश कोरगावकर, आ.विलास पोतनिस, आ.ऋतुजा लटके, आ.सुनील शिंदे, आ.प्रकाश फातर्पेकर, आ.आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख संजय कदम आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.