आदिवासी महिलेला विवस्त्र करुन अत्याचार करणाऱ्या भाजपा आमदाराच्या पत्नींवर व भाजप गावगुंड्यावर विविध कलमासह गुन्हे दाखल… — अटक केव्हा? — एड.बाळासाहेब आंबेडकर गंभीर..‌ — मात्र,महाराष्ट्र राज्यात सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर!

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

         वृत्त संपादीका 

            आदिवासींचे शेत बळकावण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करणारे बिड जिल्हातंर्गत आष्टी तालुकान्वये मौजा वाळूज येथील प्रकरण गंभीर व तितकेच संतापजनक असताना आरोपी आमदार पत्नी सौ.प्राजक्ता धस,तिला साथ देणारे भाजप गावगुंड रघू पाटील व राहुल जगदाळे यांना आष्टी पोलीस केव्हा अटक करणार?हा मुळ प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

             १५ आक्टोंबरचे अत्याचार प्रकरण असताना २१ आक्टोंबरला विविध भांदवी कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले.तद्वतच अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही.यामुळे आष्टी पोलीस दबावाखाली कर्तव्य बजावत असून आरोपींना अप्रत्यक्षपणे सहकार्य करीत आहेत काय?या संबंधाने राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सदर प्रकरणाची चौकशी केली पाहिजे असा सुर महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आहे.

            येत्या २८आक्टोंबर पर्यंत आदिवासी महिला विवस्त्र प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही तर वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर हे आष्टी येथे जाणार आहेत व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत.

              आदिवासी कुटूंबातील अत्याचारग्रस्त महिलेला व त्यांच्या कुटूंबियांना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धिर देत त्यांच्यातील भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.मात्र,सदर आदिवासी कुटूंब दहशतीत असून चिंताग्रस्त आहे. 

             बिड जिल्हातंर्गत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी महिलेवरील गंभीर अत्याचार प्रकरण रेटून धरले व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास बिड जिल्ह्यातील आष्टी पोलीसांना भाग पाडले.

             आदिवासी महिलेला त्यांची शेती बळकावण्याच्या इराद्याने विवस्त्र करुन अत्याचार करणारे प्रकरण गंभीर असल्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः जातीने सदर प्रकरणाकडे लक्ष दिले व सदर प्रकरणातंर्गत पोलीसांच्या प्रत्येक हालचालीवर ते बारीक नजर ठेऊन आहेत.

          वंचित सर्वेसर्वा एड.प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना सदर प्रकरणाकडे आवर्जून लक्ष देण्याची विनंती केली आहे.

            बिडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मौजा वाळूज प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्याकडे दिली आहे.

          मात्र,महाराष्ट्र राज्यातंर्गत अनुसुचित जाती व जमातीतील नागरिकांवर व महिला भगिनींवर सातत्याने वाढणारे अत्याचार ही गंभीर बाब असून इतर समाजातील महिलांवर दिनदहाड़े होणारे अत्याचार सुध्दा मन शुन्य करणारे आहेत.

           यामुळे महाराष्ट्र राज्यात सुव्यवस्थेचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.