सौर उर्जेवर चालणारी नळ योजना राणा प्रताप वार्डात सुरू करा… — शिवानी महिला बचत गट व राधा शारदा महिला मंडळ येथील महिलांची नगरपंचायत कुरखेडाकडे मागणी… — कुरखेडा प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये भीषण पाणी टंचाई…

      राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

       गडचिरोली/कूरखेडा

           उन्हाळ्याची चाहूल लागताच नदीपात्रातील पाण्याची पातळी खोलात जात असल्याने नळाद्वारे मिळणारे पाणी हे उन्हाळा मध्ये मिळत नसल्याने राणा प्रताप वार्ड कुरखेडा येथील प्रभाग क्रमांक‌१६ व १७ येथे पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे नगरपंचायत कुरखेडा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे. याकडे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी पाण्याच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करावी. अशी मागणी स्थानिक वार्डातील महिलांनी केली आहे.

         वार्डातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मागील पाच वर्षापासून नगरपंचायत कडे पाण्याची समस्या सोडवण्याकरिता वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे याही वर्षी सुद्धा भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. ही समस्या घेऊन कुरखेडा येथील प्रभाग क्रमांक १६ येथील शारदा स्वयंसहायता महिला बचत गट व राधा शारदा महिला बचत गटाच्या महिलांनी कंबर कसली असून नगरपंचायतने तात्काळ प्रभाग क्रमांक १६ व १७ येते सौर ऊर्जा वर चालणारी नळ योजना बसवून महिलांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरपंचायत कडे महिलांनी केली आहे.

          पाण्याच्या भिषण समस्येमुळे नदीच्या पान घाटावरून घरी वापरण्यासाठी व पिण्यासाठी महिलांना बरेच अंतर गाठून पाणी आणावे लागत आहे. त्याकरिता महिलांचा बराच वेळ हा पाण्यासाठी वाया जात असून पाणी समस्यामुळे घरा घरात भांडण निर्माण होत असल्याचे दिसून येत असून महिलांना शारीरिक व मानसिक त्रास सुद्धा उद्भवत आहे. 

            वार्डाच्या प्रत्येक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असतो. परंतु नळ योजनेच्या माध्यमातून पाणी ही प्रमुख मागणी असतानी सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून फक्त वार्डात रोड आणि नाली यांची मागणी नसताना सुद्धा मलाई खायला जास्त मिळते म्हणून आलेल्या निधीचा सदुपयोग न करता दुरउपयोग करीत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

             याकडे नगरपंचायतने लक्ष देऊन पाणीटंचाईच्या समस्येचे निराकरण करावे अन्यथा आम्हाला पाण्याकरिता नगरपंचायत कुरखेडा येथे घागर मोर्चा काढावे लागेल किंवा आम्हाला उपोषणाला बसावे लागेल असा इशारा नगरपंचायतला देण्यात आला आहे.

             यावेळी वंदना कोणप्रतिवार, माया दिघोरे ,उत्तरा नाईक,अनकंला थापा, सोनू पेंदाम ,वंदना मसराम, इंदुबाई कुंभरे ,पुष्पा येलतुरे ,शालू कुंभरे, मंजुषा कवडो, पुष्पा कोणप्रतिवार, कुंदा टेंभुर्णे, यांनी इशारा दिला आहे.