दुचाकीच्या धडकेत गेला मजुराचा जीव… — दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा अनियंत्रित गाडी चालविण्याचा बेजबाबदार प्रताप..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका

सिंदेवाही:- 

    आई बाबाच्या अति लाडाने बिघडलेले मुल आज आई वडिलांकडून हट्ट करीत दुचाकी घेऊन मागत असतात,पण वय नसताना सुद्धा दुचाकी चालवीत असतात,आणि दुचाकी चालवताना अश्या मुलाचा गाडीचा वेग ही प्रचंड असतो हे सांगायलंच नको.

        दुचाकी घेऊन भरधाव वेगाने सुसाट गाड्या चालवीत असतात.त्यांच्या अश्या बेपर्वा वृत्ती मुळे स्वतःचा जीव तर धोक्यात टाकतातच,पण कधी नियंत्रण बिघडवून सर्व सामान्य नागरिकांचा जीव घेतात.

        अशीच एक घटना सिंदेवाही तालुक्यात घडली आहे.घटनाक्रम असा आहे,मौजा सिंदेवाही मधील मारोती सोमा मेश्राम वय वर्ष अंदाजे ५० हे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी विट्टा भट्टीवर काम करण्यासाठी जात होते.

        नेहमी प्रमाणे दिनांक २१ मार्चला अंदाजे १२ ते १ च्या दरम्यान आपले काम संपवून आपल्या सहकारी मित्रांसोबत नवरगाव ते सिंदेवाही या मुख्य मार्गावरून सिंदेवाही कडे पायदळ येत होते.नवरगाव मधील रहिवासी असलेला हा अल्पवहीन मुलगा आपल्या दुचाकीने भर वेगात येत होता.एमआयडीसी जवळ रस्त्याला वळण असल्याने या अल्पवयीन मुलाचे आपल्या दुचाकी वरून नियंत्रण सुटले व त्याने पायदळ घराकडे जात असलेल्या मारोती मेश्रामला धडक जोरदार दिली.

        ही धडक इतकी जोरात होती कि सदर इसम हा जाग्यावरच गंभीर जखमी झाला,कुणीतरी कर्तव्यदक्ष व्यक्तींनी रुग्णावाहीका घटनास्थळी बोलावून तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही इथे अपघातग्रस्ताला भरती केले,पण काही वेळातच सदर इसमास तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

         एक गोरगरीब सामान्य माणूस जो सकाळी उठून आपल्या कुटुंबाला जगाविण्यासाठी काबाडकष्ट करीत होता,अश्या सामान्य व्यक्तीचा या अल्पवहीन मुलाच्या बेपर्वा गाडी चालविण्याच्या नादात नाहक जीव गेला.

         घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर भयंकर संकट कोसळले आहे.हा सामान्य नागरिक आपल्या कुटुंबाला जगाविण्यासाठी धडपड करीत होता.त्याला वाटलं ही नसेल कि आज आपला शेवट होणार आहे म्हणून.मुलाचे अति लाड पुरावीत असतांना मुलाचे वय व दुसऱ्यांचा जिव जाणार नाही याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

         अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊन त्याच्या आणि सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच लायसन्स माय बाप देतात आजच्या घडीला असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही.

        आजचे अल्पवयीन मुल भरधाव वेगाने दुचाकी चालवून स्वतःच्या व इतरांच्या जीवनाशी खेळत असतात.त्यामुळे कोणाचं तरी संपूर्ण कुटुंबंच उद्धवस्त करीत असतात,आज त्या गरीब मजुराचे पूर्णपणे कुटुंब उद्धवस्त झाले आहे.