दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त आज पहाटे ५.३० वाजता आळंदी नगरीत अभूतपूर्व असा संतभेट सोहळा पार पडला. तब्बल १७ वर्षांनंतर संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची भेट घडल्याने आळंदी नगरीत भक्तीभावाचा महासागर लोटला होता.
संत तुकाराम महाराज पालखीसोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली तुकोबारायांच्या पादुका ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपुढे आणण्यात आल्या. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने त्यांची विधीवत पूजा करण्यात आली. संतभेटीचा हा पवित्र क्षण ‘याची देह, याची डोळा’ अनुभवण्यासाठी आळंदी आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर तसेच देहु संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
या ऐतिहासिक संतभेट सोहळ्याची नंतर संत तुकाराम महाराजांची पालखी मंदिरातील कारंजा मंडपात थांबली. त्यानंतर सकाळी पालखीने देहूकडे प्रस्थान केले. नगरपरिषद चौकात मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पवृष्टी करत भाविकांनी आनंद व्यक्त केला.


