जुन्या वैमनस्यातून भरधाव कारने घरासमोर बसलेल्या सहा व्यक्तींना चिरडले.. — तीन जण जागीच ठार.. – तीन जण गंभीर जखमी.. — खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील नाचोना येथील खळबळजनक घटना.‌.

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

खल्लार :- 

       खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा नाचोना येथे अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध व महिलांच्या अंगावर घालत अक्षरशः धिंगाणा घातला.

          या खळबळजनक घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना मंगळवार ( दि.19) रात्री साडेसात ते आठ वाजता दरम्यान घडली आहे.या गंभीर घटनेने दर्यापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

              अनुसया शामराव अंभोरे (६०),शामराव लालूजी अंभोरे ( ७०),अनारकली मोहन गुजर (वय ६०) असे घटनेतील मृतकांचे नाव आहे तर गंभीर जखमींमध्ये शारदा उमेश अंभोरे (३८),उमेश शामराव अंभोरे (४०),किशोर शामराव अंभोरे (३८) सर्व राहणार नाचोना-खुर्माबाद,येथील रहिवाशी आहेत.

          खल्लार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात अंभोरे व गुजर कुटुंबातील सदस्य जेवण आटोपून घरासमोर गप्पा-गोष्टीं करत बसलेले होते.

             अचानक शेजारी काही अंतरावर राहणाऱ्या आरोपी चंदन गुजर(३२) व अंभोरे कुटुंबातील सदस्यांचा तुझ्या कुत्र्याने माझी कोंबडी खाल्ली,कोबड्या माझ्या घरात येतात सांभाळून ठेव म्हणत वाद झाला व त्यानंतर आरोपीने स्वतःची कार एम.एच.२७,डी.इ. ७४६१ भरधावपणे चालवित अंगणात गप्पा मारत बसलेल्या लोकांच्या अंगावर घातली.

           या घटनेत गरीब कुटुंबातील तीघांचा जागीच मृत्यू झाला.तर तीन जण गंभिर जखमी झालेत.

           घटनेची माहीती मिळताच अमरावती जिल्हा शिवसेनाप्रमुख गोपाल पाटील अरबट व त्यांच्ये सहकारी तातडीने गावात पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

           घटनास्थळावरून संबंधित जखमी व मृत लोकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.या प्रकाराने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सदर घटना ही जुन्या वैमान्यातून झाली आहे. 

           या घटनेतील आरोपी याचा दारूचा व्यवसाय नाचोना या गावांमध्ये अवैधपणे सुरू असून खल्लार पोलिसांच्या आशीर्वादाने सदर प्रकार राजरोसपणे गावात सुरू आहे असा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी यावेळी केला आहे.

           गंभीर जखमींना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात आले आहे.तीनही मृतदेहावर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेत.

           दरम्यान सदर घटनेची तक्रार फिर्यादी किशोर शामराव अंभोरे(३७)यांनी खल्लार पोलिसांत दाखल केली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांत आरोपी चंदन राधेशाम गुजर (३२) व राधेशाम गोविंद गुजर यांच्याविरुध्द अप न २८०/२३ कलम ३०२,३०७,५०४,५०६,३४ भादवि सहकलम १३५ बिपी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

***

आरोपीस अटक..

       तीन जणांना जागीच ठार करणारा व तीन जणांना गंभीर जखमी करणारा आरोपी चंदन गुजर हा रात्री पळून गेला होता. पळून गेलेला आरोपी हा डोंबाळा जंगल परिसरात एका नाल्यात लपून बसला असल्याची माहिती खल्लार पोलिसांना मिळाली त्यानुसार खल्लार पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस पकडून अटक केली व त्यास पोलिस स्टेशन खल्लार येथे आणले असून आरोपी खल्लार पोलिसांच्या ताब्यात आहे.उद्या (२१) तारखेला त्याला न्यायालयात हजर केल्या जाईल..

***

कोट..

तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करु..

         जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी नाचोना येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. दर्यापूर तालुक्यातील अवैध देशी दारु विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगतले. 

           अवैध देशी दारु विक्रेत्यांच्या विरोधात जे पोलिस निष्काळजीपणा करतील त्यांची सुध्दा दखल घेतल्या जाईल..

      विशाल आनंद

      जिल्हा पोलीस अधिक्षक

             (ग्रामिण)

***

नागरिकांचे पोलिस प्रशासनावर ताशेरे..

      या घटनेतील आरोपी चंदन गुजर याचा अवैध देशी दारु विक्रीचा धंदा असून त्याच्यावर १० ते १५ गुन्ह्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. हा आरोपी तडीपार करायला हवा होता.

         मात्र खल्लार पोलिसांसोबत आरोपीची मिलीभगत आहे.त्यामुळे आरोपी हा गावात अवैध देशी दारु विकत असून तो गावातील नागरिकांसोबत अरेरावीची भाषा वापरीत आहे..

   (गावातील नागरिक)