हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी… — शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

                माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथे भेसळयुक्त रासायनिक खतांमुळे नुकसान झालेल्या द्राक्षाबागांची शनिवारी (दि.18) पाहणी केली. नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निश्चितपणे न्याय मिळवून देऊ, असा दिलासा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

             बोरी गावातील सुमारे 33 शेतकऱ्यांच्या 150 एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे संपूर्ण पिक गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतांमुळे वाया जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या खतांमध्ये तणनाशकाचा अंश असल्याचे सांगण्यात येत आहे. या हानी झालेल्या द्राक्ष बागांची हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेवून चर्चा केली.

            यावेळी नुकसानग्रस्त भेसळयुक्त खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर व विक्रेत्यांवर पंचायत समितीने जंक्शन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहे. खत कंपनी व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना वैयक्तिकपणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली.

          हर्षवर्धन पाटील म्हणाले, नुकसानाची तीव्रता जास्त असल्याने अनेक द्राक्ष बागा काढून टाकाव्या लागतील, अशी स्थिती दिसत आहेत. तर जमिनीमध्ये भेसळीची खते मिसळल्याने दोन वर्षे नवीन द्राक्ष बागा या जमिनीमध्ये घेता येणार नाहीत. पंचायत समितीने तपासणीसाठी पाठवलेल्या भेसळयुक्त खताच्या नमुन्यांचे अहवाल लॅब कडून सोमवार पर्यंत येणार आहेत.

          बोरी गावातील एकही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, द्राक्ष बागांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या कंपनीवर शासनाने कडक कारवाई करावी, या संदर्भात कृषी आयुक्त पातळीवर स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना जास्तीत नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ,असे यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील नमूद केले.

         यावेळी वसंतराव मोहोळकर, रामदास शिंदे, निवृत्ती गायकवाड, दिनकर शिंदे, लालासो सपकळ, पिंटू माने, रमेश शिंदे, चंद्रकांत बोराटे, गणेश शिंदे, दशरथ शिंदे, सुधाकर चांगण, महेश ठोंबरे, धनाजी सांगळे, महेंद्र चव्हाण सह शेतकरी उपस्थित होते.

चौकट 

हर्षवर्धन पाटील यांची कृषी आयुक्तांशी चर्चा!

          बोरीतील द्राक्ष बागांच्या नुकसानी संदर्भात माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अडचणीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी कृषी आयुक्तांकडे केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.