ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रानी दिले उदमांजर व वानराच्या पिल्लाला जीवदान… — मुकी मांडवलवर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान…

चेतक हत्तिमारे

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे मागील 18 वर्षांपासून अव्हयातपणे अनेक वन्यजीव,साप, पशुपक्षी ,गंभीर जखमी हजारो जीवांना सुरक्षितपणे नागरिकांच्या घरून सोडवून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचे जीवदान देण्याचे प्रत्यक्ष कृतिपर कार्य केले जात आहे.

          नुकतीच अश्या तीन घटनामधून तिन्ही वन्यजीवाना वाचविण्यात आले.साई टायपिंग इन्स्टिट्यूट असलेल्या गिर्हेपुंजे यांचे घरी उदमांजरच्या पिल्लाने रात्री 9 वाजता उंबराच्या झाडामार्गे घरात प्रवेश केला.त्यांनतर एकच कोलाहल परिसरात माजला.लगेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व नेफडो विभागीय वन्यजीव समिती नागपूर व जिल्हा भंडाराचा निसर्गमित्र व वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे याला पाचारण करण्यात आले. त्याने शिताफीने 4 महिन्याच्या छोट्या उदमांजर पिल्लाला पकडले व पिंजऱ्यात ठेवून लाखनी वनविभागाचे नितीन उशीर यांच्या सहाय्याने निसर्गाच्या सानिध्यात सोडले.या करिता मोंटु सार्वे, नितीन फेंडरकर,साहिल तितिरमारे,रेवा वंजारी, साई टायपिंगचे प्रोपरायटर गिर्हेपुंजे यांनी उदमांजरला वाचविण्यासाठी सहकार्य केले.याबद्दल माहिती देताना ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की उदमांजरला इंग्रजी भाषेत ‘एसिअन पाम सिव्हयेट’ असे असून शास्त्रीय नाव “परडॉक्सरस हेरेस हेडीटूस’ असे आहे.निशाचर कुळातला असल्याने हा रात्री घरात शिरला असावे . मानवी वस्तीजवळ याचे अस्तित्व असते अशी माहिती त्यांनी पुरविली.

          दुसऱ्या घटनेत लाखोरी रोडवरील निवासी दिलीप निर्वाण यांच्या घरी स्लापवर वानर येऊ नये म्हणून चारही बाजूने जाळी बांधली होती त्या ठिकाणी एका छोट्या वानराचा पाय त्या जाळीत अटकल्याने त्याला ते काढता येत नव्हते. मादी वानर व इतर वानरे आक्रमक होऊन धावत असल्याने परिसरातील नागरिकांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे यांना माहिती दिली. त्यानी वनविभागाला सम्पूर्ण माहिती दिल्यावर वनविभाग कर्मचाऱ्यांची वाट पहात बसले पण पाऊण तास झाल्यावर सुद्धा वनकर्मचारी न पोहोचल्याने ग्रीनफ्रेंड्स वाइल्ड लाइफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे ,गगन पाल, धनंजय कापगते, सलाम बेग,अक्षय पालांदूरकर इत्यादींनी जोरदार प्रयत्न करीत वानराच्या पिल्लाला सुरक्षितपणे जाळीतून बाहेर काढले व मादी वानर आणि कळप आनंदाने निघून गेला. अखेर एक तासापासून ,परिसरात जमलेल्या नागरिकांनी सुद्धा सुटकेचा निःश्वास सोडला.

          तिसऱ्या घटनेत सर्पमित्र विवेक बावनकुळे याने मुकी मंडवल सापाला रेस्क्यू केले परंतु त्याच्या पाठीचा कणा तुटला असल्याचे लक्षात आले.तेव्हा श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सापाला नेऊन त्याचा एक्स रे काढण्यात आला.त्या आधारे पशुवैद्यकीय चिकित्सक गुणवंत फडके यांनी आपले कौशल्य पणाला लावून सापावर शस्त्रक्रिया केली.त्यानंतर मुकी मांडवल सापाला अधिक निगराणीसाठी गोरेवाडा झू पार्क नागपूरच्या रेस्क्यू सेंटर वर दाखल करण्यात आले.

         ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तसेच नेफडो वन्यजीव विभागीय समिती व अभा अंनिस तालुका शाखा लाखनीचे पदाधिकारी अशोक वैद्य, मारोतराव कावळे,दिनकर कालेजवार,वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर पंकज भिवगडे,सलाम बेग,विवेक बावनकुळे, मयुर गायधने, गगन पाल तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,अशोका बिल्डकाँन चे पर्यवेक्षक अभियंता नितीश नगरकर, मुंबई इन्स्पेक्टर नेताराम मस्के, गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद मेशराम,कृषीनिष्ठ इंजि.राजेश गायधनी, अशोक नंदेश्वर,ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर,सर्पमित्र खेमराज हुमे,सर्पमित्र निलेश भैसारे आदींनी ग्रीनफ्रेंड्सच्या वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर टीमचे अभिनंदन केले आहे.