राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
देसाईगंज नगरपरिषदेकडून मालमत्ता कर व इतर करांच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहिमेला काल सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.आज दि १७ मार्च रोजी सूद्धा सदर मोहीम सूरू होती दीर्घकाळापासून कर न भरलेल्या थकीतदारांविरुद्ध नगरपरिषद जप्ती पथकाने कारवाई करत थकीत मालमत्तेवर सील लावणे सूरू केल्याने थकीतदार वर्गात खळबळ माजली आहे.
नगरपरिषदेच्या कर वसुली विभागामार्फत शहरातील विविध भागातील थकीतदारांची यादी तयार करून त्यांना यापूर्वी अनेकदा नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही संबंधित थकीतदारांनी कराची थकबाकी न भरल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जप्तीची कारवाई सुरू केली असून या अंतर्गत थकीत मालमत्तेला अधिकृतरित्या सील लावण्यात येत आहे.
मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख स्वप्नील हमाने यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. या पथकामध्ये अविनाश राठोड, रविंद्र शेंद्रे , शैलेश खांडेकर, प्रफुल दुफारे, टिंकू सोनेकर, लकी बिरहा व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
नगरपरिषद प्रशासनाने थकीतदारांना थकबाकी तात्काळ भरण्याचे आवाहन केले असून अन्यथा पुढील काळात अशाच प्रकारची जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहराच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



