वारकरी संप्रदायातील कोंडी फोडण्याचे काम जोग महाराजांनी केले : डॉ.सदानंद मोरे — आळंदीत सुधीरसिंग पाटील लिखित “सोनेरी उपासना” ग्रंथाचे प्रकाशन.

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : वारकरी संप्रदायात प्रविष्ट होण्यासाठी पुर्वी एखाद्या फडाच्या मालकाच्या हातून तुळशीमाळ गळ्यात घालावी लागायची.अशा प्रकारे एखाद्या फडाशी संलग्न झालेल्या वारकऱ्यानं दुसऱ्या फडावरच्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकणंही संमत नसे. वारकरी संप्रदायाची ही कोंडी फोडण्याचं काम विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केलं. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचं घोषित केलं.असे डॉ.सदानंद मोरे यांनी आळंदी येथे बोलताना सांगितले. आळंदीत सुधीरसिंग महाराज पाटील लिखित “सोनेरी उपासना” या सोनेरी ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.नारायण महाराज जाधव, नाना महाराज चंदीले, शंकर महाराज पांचाळ, ज्ञानेश्वर महाराज शिंदे माऊली, डॉ.ज्ञानेश्वर महाराज खैरनार, माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, प्राजक्ता हरपळे, सुभाष महाराज स्वामी, जगन्नाथ महाराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली असे डॉ.मोरे यांनी सांगितले.