अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा :- मेळघाटाच्या दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं आहे. गेल्या काही दिवसांत चिखलदरा तालुक्यात अस्वलांच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून ग्रामस्थांमध्ये भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाणा, बामादेही, कन्हेरी, खंडू, अशा गावांमध्ये अस्वलांनी उच्छाद मांडला आहे.
शेतशिवारात काम करताना, जंगलालगतच्या रस्त्यांवरून जाताना, अगदी घरासमोरसुद्धा अस्वल हल्ला करत असल्याने लोक शेतात जाण्यास घाबरत आहेत. गेल्या महिनाभरात एकाच मृत्यू आणि चार अधिक जण गंभीर जखमी झाले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “हल्ला झाला की अधिकारी येतात, पंचनामा करून दोन-चार हजार रुपयांची तुटपुंजी मदत देतात आणि प्रकरण संपल्यासारखं समजतात. पण आमचं आयुष्य रोजच्या भीतीत जातंय,” अशी संतप्त प्रतिक्रिया घाण्याचे शेतकरी वसंत बावणे यांनी व्यक्त केली.
नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाला “अस्वलांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे, पण माणसांचे नाही” असा दृष्टिकोन झालेला दिसतो. “अस्वलांना विशेष संरक्षण मिळतं, पण शेतकऱ्यांच्या सुरक्षेकडे कोणी लक्ष देत नाही,” असा सवाल अनेक ग्रामस्थांनी उपस्थित केला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात अन्न-पाण्याची टंचाई आणि मानवी हस्तक्षेप वाढल्याने अस्वल वस्त्यांकडे वळत आहेत. विभागाने काही भागांत पिंजरे लावले असून ‘रेस्क्यू पथक’ तैनात केल्याचा दावा केला आहे. परंतु, ग्रामस्थांच्या मते हे उपाय अपुरे आहेत.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा मेळघाटातील जंगल परिसर “अस्वलांचा अड्डा” बनून जाईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या…
1.अस्वल हल्ल्यांवर नियंत्रणासाठी तातडीने विशेष पथक तैनात करावे.
2. शेतकऱ्यांसाठी विमा व भरपाई योजना तात्काळ लागू करावी.
3. जंगलालगतच्या गावांमध्ये प्रकाशव्यवस्था, सायरन व चेतावणी फलक लावावेत.
4. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी अस्वलांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करावे.
मेळघाटात निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. वन्यजीव संरक्षणाचे धोरण जितके आवश्यक आहे, तितकीच माणसाच्या जिवाची किंमत राखणेही गरजेचे आहे. अन्यथा, अस्वलांच्या सावटाखाली जगणाऱ्या ग्रामीणांच्या आयुष्याला भीतीचे, असहायतेचे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे ओझे सहन करावे लागेल.


