Home Political खेड तालुक्यातील मतदार यादीत दुबार नावे वगळावी, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी...

खेड तालुक्यातील मतदार यादीत दुबार नावे वगळावी, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाईची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

 खेड तालुक्यातील मतदार यादीत झालेल्या गंभीर गोंधळाबाबत तातडीने कारवाई करून निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्यात, अशी ठाम मागणी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

        मोहिते पाटील यांनी सांगितले की, आळंदी ग्रामीण गणातील मतदार यादीत सुमारे दोन हजार नावे अशा मतदारांची आली आहेत, जे प्रत्यक्षात आळंदी नगरपरिषदेच्या क्षेत्रातील आहेत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे या मतदारांची नावे ग्रामीण गणातून वगळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

        तसेच, राजगुरुनगरजवळील राक्षेवाडी येथील मतदार यादीतही अशाच प्रकारचा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. या याद्यांमध्ये राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे स्थानिक मतदार संतप्त आहेत.

        मोहिते पाटील यांनी सांगितले की, “मतदार यादीतील अशा त्रुटीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन, चुकीच्या नोंदी दुरुस्त कराव्यात आणि वाढलेले मतदार कमी करून निवडणूक स्वच्छ आणि निष्पक्ष रीत्या पार पाडावी.”

        या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मतदार यादीतील या गोंधळामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.