गोखळीच्या भुयारी मार्गावर सकारात्मक निर्णय घेणार : हर्षवर्धन पाटील… — गोखळी – तरंगवाडी ग्रामस्थांना हर्षवर्धन पाटील यांचा शब्द….

 

निरा नरशिंहपुर दि.15 प्रतिनिधी:-बाळासाहेब 

 

गोखळी-तरंगवाडी गावासाठी गरजेचा आसलेल्या भुयारी मार्गाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी, सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी पाठपुरावा करणार आसल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. गोखळी – तरंगवाडी ग्रामस्थांनी भुयारी मार्गाच्या प्रश्नी लक्ष देण्यासाठी पाटील यांना निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचे सरकार असून याप्रश्नी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सद्याची वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन, सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. प्रसंगी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढणार आसल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यातुन जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून गोखळी गावासाठी भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी गावातील नागरिक व शाळेच्या विद्यार्थी-पालकांनी महामार्गावरील गोखळी (ता. इंदापूर) येथे रस्ता रोको करून आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनात गावकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोखळी फाटा ते तरंगवाडी बस स्थानकापर्यंतचा थेट रस्ता गोखळी गावाला देण्यात आल्यामुळे इंदापूरकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना उलटमार्गी तरंगवाडी बस स्थानकापर्यंत जावे लागणार आहे. आणि तेथून मुख्य पालखी महामार्गावरूनच इंदापूरला जावे लागणार आहे. महामार्गावर वाहनांचे प्रमाण व वेग जास्त असल्यामुळे विद्यार्थी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागणार आहे, यामुळे गोखळी व तरंगवाडी गावातील ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर येणे देखील कठीण होणार आहे. त्यामुळे गोखळी गावाला उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवेदन दिलेले आहे.