सावली तालुक्यातील गावे मुल तालुक्यातील ग्रामपंचायतमधून वगळण्याची मागणी…

    सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली 

             मूल तालुक्यातील मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव तर टेकाडी ग्रामपंचायत अंतर्गत सादागड, सादागड हेटी ही गावे अंतर्भूत असून ग्रामपंचायत कार्यालय मूल तालुक्यात असताना गावे मात्र सावली तालुक्यात आहेत. मुरमाडी ग्रामपंचायतला जाण्यासाठी जंगल असून पक्का रस्ता नसल्याने 40 किलोमीटर अंतर कापून जावे लागते व इतर विकासाच्या समस्या येतात त्यामुळे मुरमाडी व टेकाडी या मुल तालुक्यातील ग्रामपंचायतीमधून वगळून सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

          सावली तालुक्यात मानकापूर,चक मानकापूर, मेटेगाव, सादागड व सादागड हेटी ही संपूर्ण आदिवासी लोकवस्तीची गावे आहेत. शेती ही सावली तालुक्यातील पेंढरी व खेडी तलाठी साज्यात आहे. या गावातील सर्व व्यवहार हे सावली तालुका मुख्यालयातून होत असतात. घरकुलची कामे, रोजगार हमीची कामे सावली पंचायत समितीमधून होतात मात्र ग्रामपंचायत मूल तालुक्यातील मुरमाडी व टेकाडी हे आहेत. मानकापूर, चक व मेटेगाव या तिन्ही गावापासून ग्रामपंचायत मुरमाडीचे अंतर 7 किलोमीटर आहे पण जंगलाची पायवाट असून पक्का रस्ता नाही, हिंस्त्र प्राण्यांचा संचार असतो व या पायवाटेने फक्त उन्हाळ्यात जाता येते. इतर ऋतुमध्ये सावली ते मूल नदीपासून ते राजोली येथून मुरमाडी येथे ग्रामपंचायतचे कामासाठी जावे लागते. सादागड, सादागड हेटी ही गावे सावली तालुक्यातील असून ग्रामपंचायत मात्र मुल तालुक्यातील टेकाडी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.

          गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता स्वतंत्र ग्रामपंचायत करावी किंवा सावली तालुक्यातील जवळच्या ग्रामपंचायतला जोडण्याची मागणी या गावातील गावकरी प्रशासनाकडे करीत आहेत. 

   कोट –

 सावली तालुक्यातील गावे मुल तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असल्याने वेळोवेळी अनेक अडचणी येत आहेत. सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील व बिडिओ मधुकर वासनिक यांनी हा विषय सकारात्मक घेतला असून सर्व गावातील पदाधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेतली आहे. 

विजय कोरेवार

जिल्हाध्यक्ष विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग काँग्रेस प्रणित