Home देशविदेश युगप्रवर्तक डॉ.बासाहेब आंबेडकरांच्या मते शेतकरी सुखी तर देश सुखी!…. — जाती...

युगप्रवर्तक डॉ.बासाहेब आंबेडकरांच्या मते शेतकरी सुखी तर देश सुखी!…. — जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे हित पाहणारे,जपणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते हे शेतकरी व शेतकऱ्यांची मुले समजून घेणार काय? — शेतकऱ्यांच्या हितसंबधाने सविस्तर माहिती…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणचे ज्ञानाचे माहेरघर!,”त्यांनी अथांग ज्ञान ग्रहण केले असल्याने ते प्रत्येक विषयांचे सखोल अभ्यासक होते.त्यांच्या सोबत कुठल्याही विषयावर चर्चा करताना सर्व विद्वांन थिटे पडायचे.

         यावरुन लक्षात येते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संस्कृतीसह भारतातील प्रत्येक धर्मांचा,त्यांच्या चालीरितींचा,प्रत्येक जातींचा,प्रत्येक पंथांचा,मनुस्मृती अंतर्गत जुलमी वर्ण व्यवस्थेचा,आर्थीक चलनाचा,शेतकऱ्यांच्या स्थितीचा,मुलनिवासी स्त्रि-पुरुषांच्या शोषण कार्यपध्दतीचा,भारतीय मुल निवासी पुरुषांवर व स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या आणि त्यांना गुलाम बनवू इच्छिणाऱ्या मानसिकतेचा,गाढा व सखोल अभ्यास होता.

          म्हणूनच त्यांनी स्पष्ट केले होते,”शेतकरी सुखी तर देश सुखी,त्यामुळे शेतीच्या समस्या वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपाय केले नाहीत तर देशातील शेती डेंजर झोनमध्ये येईल.हे भाकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केले होते.

      म्हणूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यासाठी डॉक्टर,कायदेतज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ,धुरंधर राजकारणी,प्राध्यापक,प्राचार्य,तत्त्वज्ञ,भारतीय संविधानाचे शिल्पकार,महान देशभक्त,कामगार नेते,पत्रकार,संपादक,युगनायक,मूकनायक,संसदपटू,शिक्षणतज्ज्ञ,समाजसुधारक,भारतरत्न,विश्वरत्न अशी अनेक विशेषणे वापरली जातात.

       परत कृषिप्रधान असणाऱ्या भारत देशात शेतकऱ्यांचे हित पाहणारे,’शेतकऱ्यांचे नेते’ म्हणून युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेबांची ओळख आणि त्यासंबंधीचे बाबासाहेबाचे कार्य आजही अनेकांना माहीत नाही. 

      ‘शेतकरी सुखी.. तर देश सुखी’, असं म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांसाठी काय करतात? आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काय सांगतात? हे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांना समजले पाहिजे.ते शेतकरी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना उमजले पाहिजेत.

       काळाच्या पुढचा विचार करणारे दूरदृष्टीचे युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०० वर्षांपूर्वी, १९१८ साली शेतीच्या समस्या व उपाय सांगणारे ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज’ हे पुस्तक लिहिले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. 

       शेतीची वाढत्या पिढीनुसार,विस्तारित कुटुंबानुसार सतत होणारी विभागणी ही भविष्यात शेतकऱ्यांना अल्पभूधारक करण्यास कारणीभूत ठरणार आहे,हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजपासून शंभर वर्षांआधी सांगतात.

        पूर्वजांकडे शेकडो एकर जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांकडे आज केवळ पोट भरावे इतकेच जमिनींचे तुकडे उरले आहेत.आज ते अल्पभूधारक झालेले आहेत.भविष्यात हे असं होईल,हेच बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षांपूर्वी सांगत होते.

      यावर उपाय म्हणून भारत निर्माता डॉ.बाबासाहेब सांगतात,तुमचं एकच मूल शेतीत ठेवा. इतर मुलांना उद्योग,व्यापार,शिक्षण,सेवा क्षेत्रामध्ये घाला. म्हणजे शेतीवरील उपजीविकेचा ताण कमी होईल,जमिनीच्या वाटण्या कराव्या लागणार नाहीत.फक्त शेतीवरच तुमच पूर्ण कुटूब अवलंबून राहणार नाही. 

        आज आपण पाहतोय की,शेतकरी ओरडताना दिसताहेत की,आम्ही शेती करतो आणि आमची प्रगती होत नाही,दुष्काळ पडला तर आम्हाला खायलाही काही राहत नाही.आत्महत्या करण्याची वेळ येते.मग मुलंबाळं शिकवायची कशी ? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आजच्या काळात आवासून उभा आहे.

       अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळावर जो पहिला मोर्चा काढला,तो कुठल्याही एका जाती-धर्माचा नव्हता,अस्पृश्यांचा नव्हता,तर तो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काढलेला शेतकऱ्यांचा मोर्चा होता.असे शेतकरी नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,हे आज शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पोरांना समजले पाहिजेत.

     म्हणूनच दूरदृष्टी अन्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हाच सांगत होते की,एक मूल शेतीमध्ये आणि दुसरं मूल उद्योग,व्यापार,शिक्षण,सेवा क्षेत्रामध्ये म्हणजे नोकरीला लावा किंवा व्यवसायात पाठवा.तिथून तुम्हाला नियमितपणे निश्चित,ठराविक आर्थिक उत्पन्न मिळेल. 

       अशा दूरदृष्टीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला कळले असते,तर शेतीचं इतकं विभाजन,तुकडे झाले नसते आणि अल्पभूधारक होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नसती.

      अनेक शेतकरी संघटना, शेतकरी,पक्ष शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव,योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलनं करतात.योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याची पिके कवडीमोल दराने विकावी लागतात.प्रसंगी रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. 

      कारण,शेतमाल विकणे परवडत नाही,योग्य भाव शेतमालाला मिळत नाही.यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेतमालाला योग्य बाजारभाव,हमीभाव मिळावा,तो दर उत्पादन खर्चावर निर्धारित करावा ही संकल्पना १०० वर्षांपूर्वी मांडतात.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारला जे सांगतात ते खूप महत्त्वाचे आहे.ज्याप्रमाणे इतर उत्पादन घेणाऱ्या व्यवस्थांना उद्योग,कारखानदारीचा दर्जा आहे,अगदी तशाच प्रकारे शेतीला सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा.

      शेतीला जर उद्योगाचा दर्जा मिळाला तर शेतकरी उद्योजक म्हणून अर्थव्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करतील,हा विश्वास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाटतो.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९२९ साली शेतकरी परिषद घेतात.बाबासाहेबांची राजकीय व सामाजिक भूमिका देशातील नागरिकांना माहीत आहेत.पण अस्पृश्यांचा लढा,संविधानिक कार्य यांच्यापलीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांची शेतकरी परिषद घेतली होती.

        भारत निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य,भूमिका जनतेपर्यंत पोहोचलीच नाही किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न भारत सरकारने,भारत देशातील राज्य सरकारांनी व शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांनी केला नाही. 

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी परिषद घेतली होती.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात १० जानेवारी १९३८ रोजी विधिमंडळावर जो पहिला मोर्चा काढला,तो पहिला मोचां कुठल्याही एका जातीचा,धर्माचा,दलितांचा किंवा अस्पृश्यांचा नव्हता तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा हा शेतकऱ्यांचा होता.

       खोती पद्धत बंद व्हावी,शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी,शेतीला मुबलक पाणी मिळावे,शेतकरी हिताचे कायदे करावेत,या त्यांच्या मागण्या होत्या.शेतसारा शेतकऱ्यांकडून कशाप्रकारे आकारला जावा,याबद्दलही डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख लिहितात व सरकारला जाब विचारतात. 

       दि.१८ ऑगस्ट १९२५ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक लेख लिहिला व त्या लेखांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निव्वळ उत्पन्नाचा अंदाज,यावर शेतसारा लावणे व शेतकऱ्यांकडून सरसकट,अवास्तव शेतसारा वसूल करणे हे गैर,अन्यायकारक व शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे आहे,असे जळजळीत वास्तव मांडले.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबई विधिमंडळात गेले,तेव्हा विधिमंडळात गेल्यानंतर त्यांनी जे पहिलं भाषण केलं,ते पहिलं भाषण जाती,धर्माना न्याय द्या,किंवा त्यांचे प्रश्न मांडणारे नव्हते तर,शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचं हे भाषण होतं.हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.

      शेतीमध्ये प्रत्यक्ष कष्ट करणाराला,मशागत करणाराला त्याच्या त्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे.खोत आणि इनामदार हे लोक दलालासारखे शेतकऱ्यांच्या कष्टाचे लोणी खात असतात,ते थांबले पाहिजे.कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान मजुरी देण्याचा कायदा करण्यात यावा.शेतकऱ्याला थकीत शेतसारा माफ करावा आणि शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा,अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळात केल्या होत्या.

          पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे पहिले पाटबंधारे आणि ऊर्जामंत्री म्हणून काम करताना जर प्रथम प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते शेतकऱ्यांच्या हिताला दिले होते.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १५ मे १९५० रोजी खोती निर्मूलन अधिनियम लागू केला.या अधिनियमाचा परिणाम असा झाला की,१ लाख २२ हजार ८६० एकर जमीन या खोत,इनामदार यांच्या तावडीतून मुक्त झाली आणि ती कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाली.त्यामुळे शेतकरी हे प्रत्यक्ष शेतजमिनींचे मालक झाले आणि त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळू लागलं.

        तद्वतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पाटबंधारे व ऊर्जा खाते त्यांच्याकडे असताना या देशासाठी आणि त्यात शेतीसाठी महत्त्वाची धोरणे राबवली.या देशातील प्रत्येक शेतकऱ्याचं हित कसं होईल,प्रत्येकाच्या घरात धनधान्य कसं जाईल,तो सधन कसा होईल? हा दृष्टिकोन ठेवून बाबासाहेबांनी जलधोरणाची उद्दिष्टे निश्चित केली.एवढेच नाही तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,शेती हा असा व्यवसाय आहे की,त्यावर या देशातले सगळे उद्योगधंदे अवलंबून आहेत.त्यामुळे सर्व उद्योगधंदे नीट चालावे आणि देशाची प्रगती व्हावी,यासाठी त्यांना कच्चा माल देणारा जो मूळ व्यवसाय आहे,तो म्हणजे शेती.हा उद्योग नीट चालला पाहिजे म्हणून शेतीला सर्व सोयीसुविधा व इतर आवश्यक गोष्टी मिळाल्या पाहिजेत.त्यातील पाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.हे पाणी शेतीला मुबलक मिळालं पाहिजे,हे धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मांडतात.

        या देशांमध्ये दामोदर खोरे प्रकल्पाचा धाडसी निर्णय पाटबंधारे मंत्री असताना घेतात.ज्याप्रमाणे इतर उत्पादन घेणाऱ्या व्यवस्थांना उद्योग,कारखानदारी दर्जा आहे,अगदी तशाच प्रकारे शेतीला सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा,असा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९४० च्या दशकात मांडला होता.

        त्याचबरोबर या देशात टीकारपार,हिराकुंड,सोननदी, नीरज येथीऋ महानदीवर धरणे उभारले गेली,ती केंद्रीय पाटबंधारेमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली!,यासह हैदराबाद,मद्रासमध्ये सरकारमध्ये असणारे विविध मतभेद बाबासाहेबांनी मिटवले आणि तुंगभद्रा धरण,चंबळ नदी प्रकल्प,दक्षिणेकडील अनेक छोटे-मोठे प्रकल्प,पंजाब राज्यातील अनेक जलप्रकल्प,अशा अनेक जलधोरणांची आखणी आणि या प्रकल्पांची सुरुवात व पूर्तता पाटबंधारे व ऊर्जामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झाली. 

        यामुळे संपूर्ण देशातील शेतीला नवचालना मिळाली.शेती उत्पादनात वाढ झाली.शेतकरी संपन्न झाला.शेतकऱ्याला त्यांचे हक्क, अधिकार व हक्काचे पाणी मिळाले आणि जमिनी हिरव्यागार झाल्या.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,भारत देशामध्ये आपल्या अभ्यासपूर्ण धोरणांनी,जलविषयक नियोजनाने आणि पाटबंधारे मंत्रिपदाच्या काळातील निर्णयांनी या देशात जल विकासाचा पाया घातला आहे.दूरगामी विचार करत भारतातील जल धोरणांचा पाया घालणारे जलनायक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत.

       आपल्या देशामध्ये अनेक राज्यांत,अनेक प्रांतांमध्ये दर दोन-तीन वर्षांनंतर भयानक कोरडा दुष्काळ पडतो.पाण्याविना शेती ओसाड होते.शेतकरी उद्ध्वस्त होतो,जनावरं मरतात आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होते.त्या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघताना पुन्हा त्याची पुढची तीन-चार वर्षे जातात आणि पुन्हा नव्याने दुसरा दुष्काळ समोर उभा ठाकतो. 

        युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षांआधी ह्या दुष्काळाचा विचार करतात.पाटबंधारेमंत्री असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर दुष्काळ पडून शेतकऱ्यांवर जे अस्मानी संकट येतं,त्यावर आपण कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे,असे सांगत नदीजोड प्रकल्प सुचवतात.

       हिमालयात ज्या नद्या उगम पावतात,त्या नद्यांमध्ये बर्फ माठलेला असतो आणि तो बर्फ उन्हाळ्यात उष्णतेने उवितळतो.उन्हाळ्यात त्या भागामध्ये,नद्यांना पूर येतो.जर नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागातील नद्यांना जोडल्या तर उन्हाळ्यात त्या भागात नद्यांना जो पूर येतो,त्याचं पाणी या दुष्काळी भागाकडे वळवता येईल व दुष्काळ नाहीसा करता बेईल.त्यामुळे शेतीचं नुकसान होणार नाही,शेतकरी वाचेल.त्याचं कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही,हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षांपूर्वी सांगतात.असे शेतकऱ्यांचे हित पाहणारे शेतकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजले पाहिजेत.

      यावर समस्या व उपाय सांगताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शेतकरी सुखी तर देश सुखी,त्यामुळे या समस्या वेळीच ओळखून यावर तातडीने उपाय केले नाही,तर देशातील शेती अन् शेतकरी हा डेंजर झोनमध्ये येईल,हे भाकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षांपूर्वी करतात.

     आज नेमकी शेतीची काय परिस्थिती आहे? आणि शेतकऱ्याला आत्महत्या का कराव्या लागत आहेत? याचा जर विचार केला तर,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतिविषयक समस्या सांगून,त्यावर उपायही सांगितले होते,ते किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते.भारत सरकार व भारतातील राज्य सरकारांनी जर ते अमलात आणले असते तर शेतकऱ्यांवर आज ही वेळ आली नसती.हे आज शेतकऱ्याच्या मुलांच्या लक्षात येईल.

         त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला जाती-धर्माच्या पल्याड,शेतकऱ्यांचे हित पाहणारे शेतकऱ्यांचे पुरस्कर्ते,शेतकऱ्यांचे कैवारी,शेतकरी नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत. 

    शेतकऱ्यांचे हित व शेतकऱ्यांवरील संकटे पाहताना शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर या देशातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करतात,त्यांच्या परिवारांचा विचार करतात,त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करतात,हे आजच्या पिढीने लक्षात घेतलं पाहिजे.याचबरोबर शेतकऱ्यांचे कैवारी,शेतकऱ्यांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकरच आहेत हे आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत.

      आजच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना वाटतं की डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशांमध्ये फक्त अस्पृश्याचा विचा करणारे,अस्पृश्यांसाठी लढाई लढणारे,अस्पृश्यांना हक,अधिकार मिळाल देणारे अस्पृश्यांचे नेते होते.

        पण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्याही आधी या देशातील सर्व शेतकऱ्यांचा विचार करणारे,सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी विधिमंडळात आवाज उठवणारे,विधिमंडळावर मोर्चा काढणारे आणि केंद्रीय मंत्री असताना शेतकरी हिताचे निर्णय घेणारे शेतकऱ्यांचे नेते होते,हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर आजच्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी समजून घेतले तर आजच्या सरकारकडून शेतकरी हिताचे कोणते कायदे करायचे? ते कशा प्रकारे संमत करून घ्यायचे? शेतकरी हिताच्या कोणत्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत ? त्यासाठी आवाज कसा उठवायचा? याचे मार्ग नक्की सापडतील.

       त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडक यांचे हे शेतकरी हिताचे कार्य,देशाचे शेतकरी नेते म्हणून असणारे कार्य,किती महत्त्वाचे आणि देशाच्या शेती व्यवस्थेवर,अर्थव्यवस्थेवर किती दूरगामी परिणाम करणारे आहे,हे शेतकऱ्यांसह सर्वांच्या लक्षात येईल.