Home देशविदेश राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये फुले-आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात… — सामाजिक...

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये फुले-आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात… — सामाजिक परिवर्तनाचा संदेश..

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,रिसर्च अँड टेक्नॉलॉजी,चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त IE हॉलमध्ये भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

       विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि महान विचारवंतांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल झेड.चिताडे होते,तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.अभिलाषा गावतुरे (MBBS, DCH) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 

     तसेच डॉ.धनंजय डुंबेरे आणि डॉ.अल्का सावलीकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमास प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सभागृहात आदर आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

             प्रमुख पाहुण्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी आपल्या प्रभावी व प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही,तर मानवी मूल्ये जपणे आणि समाजाशी नाते टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांना आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचे आवाहन केले.

       त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे.शिक्षणामुळेच समाजातील विषमता कमी होऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळू शकते.

        त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ करिअरच्या दृष्टीने न पाहता,समाजसेवेच्या माध्यम म्हणूनही पाहावे.” त्यांनी विशेषतः मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला.

       तसेच त्यांनी आरोग्य क्षेत्रातील आपले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना जीवनशैली,मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक संवेदनशीलता यांचे महत्त्व समजावून सांगितले. “एक चांगला व्यावसायिक बनण्याबरोबरच एक संवेदनशील नागरिक बनणे ही काळाची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांनी दिली.

       अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.अनिल झेड.चिताडे यांनी प्राथमिक शिक्षणाच्या महत्त्वावर विशेष भर दिला.“प्राथमिक शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची पायाभरणी असते.गुणवत्तापूर्ण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे सक्षम समाजनिर्मितीसाठी अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

       तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी दिलेले समानता,शिक्षण आणि न्यायाचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.त्या विचारांचा प्रसार करणे आणि त्यानुसार आचरण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्मिता काळे यांनी केले.त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देत महापुरुषांच्या कार्याचा आढावा मांडला. सूत्रसंचालन सारंगी धोटे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले,ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

       कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 

        या कार्यक्रमातून उपस्थितितांना सामाजिक जाणीवा,समता आणि शिक्षणाचे महत्त्व यांचा प्रेरणादायी संदेश मिळाला.