पित्याचे छत्र गमावलेल्या वृंदाचे शेडमाके यांनी घेतले पालकत्व… – लग्नासाठी एक लाखाची मदत, कर्जबाजारी कुटुंबाला मोलाचा आधार… — नापिकीला कंटाळून वडिलांनी केली होती आत्महत्या…

ऋषी सहारे

संपादक

       कुरखेडा : ज्याने जन्म देऊन मोठे केले त्या पित्याने नापिकीच्या भीतीने मृत्यूच्या दारात पाऊल ठेवले. कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना त्या अभागी पित्याच्या तरुण मुलीचे लग्न कसे होणार? हा प्रश्न होता. पण आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी तिचे पालकत्व घेऊन लग्नाची जबाबदारी स्वीकारत एक लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला. गावकरी, नातेवाईकांच्या साक्षीने त्यापैकी ५१ हजारांची मदत शेडमाके यांनी सोमवारी त्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.

तालुक्यातील कुंभीटोला येथील देवराव मानकू नैताम या शेतकऱ्याने आठवडाभरापूर्वी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. महावितरणच्या मनमानी भारनियमनामुळे अवघ्या दीड एकर शेतातील धानपिक करपून जात असल्याचे दुःख असह्य झाल्याने नैताम यांनी आठवडाभरापूर्वी आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले. पोटभर अन्न मिळण्याचे वांदे आहे तिथे मुलगी वृंदा (२६ वर्ष) हीचे लग्न कसे करणार ही चिंता मृत देवराव नैताम यांच्यासह त्यांची पत्नी सुमन यांना सतावत होती. आतातर घरातील कर्ता पुरुषच गमावला. या कुटुंबाची ही स्थिती पाहून आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी वृंदाचे पालकत्व स्वीकारत तिच्या लग्नासाठी एक लाखाची मदत देण्याचे निश्चित केले. एवढेच नाही तर सोमवारी कुंभीटोला गाठून नैताम कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना ५१ हजार रुपयांची मदत दिली. लग्न जुळताच आणखी ५० हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सर्वांसमक्ष सांगितले.

यावेळी गावचे उपसरपंच मधुकर गावडे, माजी प.स. सभापती परसराम टिकले, आदिवासी काँग्रेसचे कुरखेडा तालुका अध्यक्ष श्रीराम दुग्गा, कोरचीचे राजेश नैताम, काँग्रेस नेते पुंडलीक तोंडरे युवा नेते पिंकू बावणे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, विठ्ठल खानोरकर, विनोद बोरकर, दुर्योधन सहारे, सुनंदा तोंडरे, सुनिता कोरेटी, प्रेमिका हलामी, सुरेखा हलामी, सविता सहारे, रमण कुमोटी, वैजयंता सोनवाने, गीता मुरकुटे आदी उपस्थित होते.

      वृंदा झाली भावूक

 पित्याचे छत्र आणि आधार गमावल्याने वृंदा खिन्न झाली होती. पण शेडमाके यांच्या रूपाने जणू आपले पिताच आपल्या मदतीसाठी धावून आल्याची भावना तिच्या मनात दाटून आली. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ही मदत आमच्यासाठी खूप मोलाची आहे असे म्हणत तिने अश्रुंना वाट मोकळी करून दिली.