Home Social शाळा महाविद्यालयांना सुट्टी… — पूरपरिस्थितीत पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नका...

शाळा महाविद्यालयांना सुट्टी… — पूरपरिस्थितीत पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नका :- आरमोरी तहसीलदार यांचे आव्हान…

ऋषी सहारे

  संपादक

आरमोरी :- गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या अतीवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणातुन वैनगंगा नदीपात्रामध्ये एकुण 33 दरवाजे 2.00 मी. उघडून त्यामधुन 15,000 क्यूमेक्स विसर्ग सुरु आहे. यापुढे गोसेखुर्द धरणाच्या येवामध्ये वाढ झाल्यास धरण व भंडारा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पर्यंत विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

        गोसेखुर्द धरणातील सुरु असलेला विसर्ग व मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणातील अतीवृष्टी यामुळे आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदी, तीच्या उपनद्या व नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येवून तालुक्यातील आरमोरी-गडचिरोली, आरमोरी वैरगड, देलनवाडी-वैरागड, वैरागड-करपडा, वैरागड-कढोली, जांभळी-रांगी, आरमोरी-जोगीसाखरा हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत.

        तसेच तालुक्यातील कोसरी प्रकल्प 100% भरलेले आहे. सदर आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणुन दिनांक 9 व 10 जुलै, 2025 रोजी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व अंगणवाडी यांना तालुका प्रशासनाव्दारे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

      दिनांक 8.7.2025 रोजी रात्री अंदाजे 8.30 चे दरम्यान गडचिरोली वरून नागपुरकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस 45 प्रवाशांना घेवून वाहत्या पाण्यातुन काढण्याचा प्रयत्न करीत असतांना पुराचे पाण्यात मध्यभागी बंद पडून प्रवाशी अडकले होते. तसेच त्याच दरम्यान दुसरी एस.टी बस अंदाजे 23 प्रवाशांसह मौजा ठाणेगांव येथे अडकलेली होती.

        त्यामुळे आरमोरी तालुका प्रशासनाच्या वतीने व गावकऱ्यांचे मदतीने ट्रॅव्हल्स व बस मधील प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यांत येवून त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

       तालुका प्रशासनाच्या वतीने आरमोरी तालुक्याचे तहसिलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, पोलीस निरीक्षक गवते, मंडळ अधिकारी जी.एम. कुमरे, महसुल सेवक दिपक लिंगायत, ग्रामपंचायत कर्मचारी व मौजा ठाणेगाव येथील गावकरी व तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरीक यांचे मदतीने पहाटे 2.00 वाजेपर्यंत बचाव मोहीम राबविण्यात आली. सुदैवाने या दोन्ही बस मधील प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नसुन सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

         अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये म्हणुन तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडून जाण्याचा प्रयत्न करु नये. वाहत्या पाण्यात वाहने टाकण्याचा प्रयत्न करु नये, पाण्याजवळ सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये, तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये.

        आपले जवळपास काही अनुचीत घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे दुरध्वनी क्रमांक 07137-266560, मो.क्रं. 8378075297 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा पोलीस प्रशासनाचे दुरध्वनी क्रमांक 9850085532 यांवर तात्काळ संपर्क साधुन अवगत करावे, असे आवाहन तहसिलदार आरमोरी यांनी केले आहे.