👁️10 जून डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टी दिन 👁️   

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत                                         

               राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतीदृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते.

         डॉ. भालचंद्र यांचे संपूर्ण नाव डॉ. रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र असे होते. त्यांचा जन्म 10 जून 1926 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 10 जून 1971 रोजी झाला. योगायोग असा की त्यांचा जन्म देखील दहा जून आणि मृत्यू देखील 10 जूनला झाला.

         डॉ. भालचंद्र हे प्रख्यात नेत्र शल्य चिकित्सक होते. त्यांच्या जीवन कालावधीत कुठलीही आधुनिक सोयीसुविधा नसताना अंधत्व निर्मूलन कार्यक्रमामध्ये हजारो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या.

          त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टि क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 10 जून ते 16 जून हा डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जातो. शासकीय सेवेतील नेत्रशल्य चिकित्सक डॉ रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले.

          खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर 80 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले. नेत्रदानासारख्या महान कार्याचे महत्त्व देखील त्यांनी जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले.

          नेत्रदान हे अन्ध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणतो. नेत्रदान करून अंधांना जीवन जगण्यासाठी हे नेत्र फार उपयोगी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अन्ध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदान करणे आवश्यक आहे. एक वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

           आधी इच्छा पत्र भरले नसले तरीही नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येतो. एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला असेल, डोळ्यांचे ऑपरेशन झाले असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असेल. उच्च रक्तदाब व मधुमेह असणारे व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. नेत्रदान केल्याने चेहऱ्यास विद्रूपता येत नाही.

          नेत्रदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर नेत्र विभाग येथे संपर्क साधावा, असे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉ. महादेव चिंचोळे तसेच अति. जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. सोनारकर, व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे यांनी जनतेला आवाहन केलेले आहे.