शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जनतेची अन्न व पाण्याविना उपासमार.. – मंत्री येऊन गेले,”हे,अर्ध्या लोकांना कळले सुध्दा नाही..

 

अनिलकुमार एन. ठवरे

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

गडचिरोली :- आजादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत गडचिरोली मुख्यालयी भव्य प्रमाणात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हा व तालुका स्तरावरून एस. टी.बसेस पाठवून जनतेला पाचारण करण्यात आले.

          या कार्यक्रमासाठी भव्य प्रमाणात महिला व पुरुष यांनी मुख्यालयाच्या एम.आय. डी.सी. ग्राऊंडवर हजेरी लावली.

          मुख्य म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मु्ख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. अजित पवार हे येणार होते.जनता त्यांना भेटण्यासाठी व ऐकण्यासाठी सकाळीच उपाशीपोटी कार्यक्रम स्थळी पोहोचली. 

           जनता भव्य प्रमाणात उपस्थित होती तर प्रशासनाची नाष्टा – पाण्याची सोय तोकडी होती. त्यामुळे काहीना अन्न मिळाले तर हात धुवायला पाणी नाही.

          काही लोकांना तर डबक्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्याने हात धुवावे लागले इतकेच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा लोकांना वाट पहावी लागली.जनता अन्न व पाण्यासाठी ओरडत होती.

           गंमत अशी की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येऊन गेले.परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले व गेले हे कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्ध्या लोकांना कळले सुध्दा नाही.

           काही लोक जेवणासाठी तर काही हेलीपडच्या सभोवताल मंत्री महोदय केव्हा येणार याची वाट बघत होते.या कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीचा जबाबदार कोण? अशा प्रकारची लोकांमध्ये चर्चा सुरू होती.