दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी यंदा सोहळाप्रमुखपदी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.राजेंद्र बाबूराव उमाप यांची निवड करण्यात आली आहे. माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी ही माहिती दिली. यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होणार असून २५ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
आळंदीत संस्थान कमिटीच्या बैठकीत सोहळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करताना उमाप यांची सोहळाप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे देखणे यांनी सांगितले. ॲड.उमाप हे पुण्यातील ज्येष्ठ वकील असून त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनात होईल, असा विश्वास संस्थानकडून व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, सोहळाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर उमाप यांनी वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. “पालखी प्रस्थानापासून सोहळा पंढरपूरात दाखल होईपर्यंत तसेच पंढरपूरहून परतीच्या प्रवासातही लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाईल. प्रशासनाशी समन्वय ठेवून सोहळा वैभवात, आनंदात, शिस्तीत आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील,” असे त्यांनी सांगितले.



