Home Maharashtra नं.पा. कापगते विद्यालयात नारी शक्तीचा जागर… — जागतिक महिला दिन उत्साहात...

नं.पा. कापगते विद्यालयात नारी शक्तीचा जागर… — जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

          साकोली येथील नं.पा. कापगते विद्यालयात ८ मार्च २०२६ रोज रविवारला ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांचे समाजातील स्थान आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

             कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता शाळेच्या भव्य प्रांगणात विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

            शाळेच्या मा.मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील आदरणिय सौ.एस.एन.गहाणे,सौ. व्हि.आर.लिमजे,सौ. एस. वाय. कऱ्हाडे, कु.एम.आर. शिवणकर, कु. के.एल. लांजेवार, कु. रविता बोरकर, कु. भूमिता नाकाडे,सौ.भावना गहाणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.बी. कापगते, सेवाजेष्ट शिक्षक श्री. डी.एस. बोरकर,श्री. के.जी. लोथे व आदी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते.

               यावेळी विद्यार्थ्यांनी महिलांच्या कर्तृत्वावर आधारित भाषणे,पोवाडा, स्वरचित कविता, महिला शौर्य गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकूनकौतुकाची थाप मिळविली.

        “नारीशक्ती म्हणजेच राष्ट्रशक्ती! जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने प्रगती होते.” 

             आपल्या आयुष्यातील माता, बहीण, पत्नी आणि मैत्रीण या नात्याने महिलांनी दिलेल्या त्यागाला आणि कष्टाला आपण सलाम करूया. प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देऊया आणि एक सक्षम समाज घडवूया”.असे प्रतिपादन मंचावरील प्रमुख पाहुण्या सौ.एस.एन. गहाणे यांनी केले.

        ” महिला दिनाची सुरुवात एका ऐतिहासिक संघर्षातून झाली, जिथे स्त्रियांनी आपल्या कामाच्या ठिकाणी समानता, रास्त पगार आणि सन्मानाची मागणी केली होती. 

            आजही अनेक ठिकाणी महिलांना भेदभाव आणि असमानतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ एका दिवसापुरता सन्मान न करता, त्यांना वर्षभर सुरक्षित आणि न्यायपूर्ण वातावरण देणे गरजेचे आहे ” असे मत श्री. के.जी. लोथे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

           अध्यक्षीय भाषणात मा.मुख्याध्यापिका श्रीमती.आर. बी.कापगते म्हणाल्या की, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच, पण आता स्त्रियांनी स्वतःच्या यशाचे शिखर स्वतः सर केले आहे. मुलींनी शिक्षणासोबतच स्वावलंबी आणि निर्भय होणे ही काळाची गरज आहे.”

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एस.आर.देशमुख सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.एस.व्ही.कामथे सर यांनी केले. सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन या दिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.              

       सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांना नारी शक्तीचा सन्मान करण्याची शपथ देऊन वंदेमातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विद्यालयातील सर्व सन्मानीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.