शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथील पाणीपुरवठा योजना अडीच वर्षांपासून सुरू असूनही एकाही घराला पाणी मिळाले नाही.यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालाबाबत व अनियमिततेबाबत तातडीची चौकशी करुन तत्सम सर्व अभियंतावर उचित कार्यवाही करण्याची मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी व चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे की,मी ग्रामपंचायत शंकरपूर येथील लोकनियुक्त उपसरपंच या नात्याने तसेच ग्रामस्थांचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत गंभीर व जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
मौजा शंकरपूर गावामध्ये “हर घर नल – हर घर जल” अंतर्गत पाणीपुरवठा योजना गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे,परंतु आजतागायत एकाही घराला प्रत्यक्ष पाणीपुरवठा झालेला नाही,ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
१) कामांची अपूर्णता व जीवितास धोका…
• गावातील रस्ते अर्धवट खोदलेले असून ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत.
• पाणीपुरवठा पाइपलाईन अनेक ठिकाणी अपूर्ण व उघडी आहे.
• स्विच रूम,वीज साहित्य व इतर उपकरणांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
• या परिस्थितीमुळे लहान मुले,महिला व वयोवृद्ध ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
२) चुकीचा अहवाल व प्रशासनाची अनियमितता….
संबंधित अभियंता व कंत्राटदार यांनी वास्तविक परिस्थितीशी विसंगत व खोटा पूर्णत्वाचा अहवाल सादर केला आहे.
यामुळे शासन स्तरावर चुकीची माहिती गेली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे.
आजपर्यंत दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनावरील विश्वास ढासळत चालला आहे.
३) ग्रामस्थांचे हक्क व आंदोलनाचे कारण….
हे आंदोलन केवळ मागणीपुरते मर्यादित नसून ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांसाठी आहे.
“हर घर नल – हर घर जल”योजनेचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना मिळावा,यासाठी ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे,हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
४) दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन….
आंदोलनाच्या वेळी संबंधित अभियंत्यांनी एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले होते.परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस प्रगती अथवा काम पूर्ण झालेले नाही.
यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून प्रशासनाकडून विश्वासघात झाल्याची भावना आहे.
५) भविष्यातील कायदेशीर कारवाई…
जर तातडीने काम पूर्ण झाले नाही,तर उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार.
• दोषी अभियंता व कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर नोटीस देणार.
• पोलीस तक्रार व इतर घटनात्मक मार्गांचा अवलंब करण्यास मी व सर्व ग्रामस्थ बाध्य राहू.
या संपूर्ण परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व प्रशासनावर राहील,असे स्पष्टपणे नमूद निवेदनात केले आहे.
उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे की चंद्रपूर जिल्हाधिकारी महोदयांनी सदर प्रकरणात तातडीने वैयक्तिक लक्ष घालून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी,स्वतंत्र चौकशी करावी,दोषींवर कठोर कारवाई करून शंकरपूर ग्रामस्थांना न्याय द्यावा.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य,ना.गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.



