आळंदी नगरपरिषदेच्या शाळांचे विभाजन करून अधिकच्या शाळा निर्माण कराव्यात : माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी शहरातील वाढती लोकसंख्या बघता आळंदी नगरपरिषद शिक्षण विभागाच्या आळंदी शहरात चार शाळा असून या चारही शाळांचा पट ५०० पेक्षा अधिक आहे.‌ आळंदी शहरामध्ये अध्यात्मिक (वारकरी) शिक्षण देणाऱ्या संस्था असून या संस्थांमध्ये दरवर्षी अध्यात्मिक व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. काही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. शालेय व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात भौतिक सुविधा कमी पडतात त्यामुळे सुविधांवर अनावश्यक ताण येतो. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत अधिक प्रमाणात नगरपरिषदेच्या शाळांचा विस्तार करुण अधिकच्या शाळा निर्माण कराव्यात अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

       आळंदी नगरपरीषदेच्या शाळा संदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, माजी शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे उपस्थित होते.

       यावेळी बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगितले की शालेय व्यवस्थापन योग्य होण्यासाठी स्ध्यास्थितीला असणाऱ्या चारही शाळांचे विभाजन करून आळंदी शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या भागाचा विचार करता वाढलेल्या भागांमध्ये अधिकच्या शाळा निर्माण करण्यास मंजुरी मिळावी. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळेल.