उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
औरंगाबाद : शहरातील सोमवार,शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.हा निर्णय जनविरोधी असून तात्काळ मागे घ्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शहरातील आठवडी बाजार हे केवळ व्यापाराचे केंद्र नसून हजारो ग्रामीण शेतकरी, मजूर,लहान व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल थेट शहरात विक्रीस आणत असल्याने त्यांना योग्य दर मिळतो,तसेच शहरातील नागरिकांनाही ताज्या भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतात.
जर हे बाजार बंद करण्यात आले,तर हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय शहरातील मजूर, हातगाडीवाले,छोटे विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागेल,असेही निवेदनात म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाला आवाहन करण्यात आले आहे की,आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि शेतकरी, व्यापारी व नागरिकांच्या हिताचा विचार करून बाजार नियमित सुरू ठेवावेत. आवश्यक असल्यास बाजार व्यवस्थापनात सुधारणा करून ते सुरळीतपणे चालू ठेवावेत. दरम्यान, हा निर्णय मागे घेतला नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.



