Home Vidarbha साई नगरात बिबट्याचा वावर – नागरिकांनी सतर्क राहावे! — मस्जिदहून परतताना...

साई नगरात बिबट्याचा वावर – नागरिकांनी सतर्क राहावे! — मस्जिदहून परतताना नागरिकासमोर बिबट्याचे दर्शन… — आरडाओरड केल्याने टळला संभाव्य धोका… — रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन…

   अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

     दखल न्यूज भारत 

         सिंदेवाही येथील साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटे साधारण १.३० वाजताच्या सुमारास मस्जिदमधून घरी परतत असताना पत्रकार अमान कुरेशी यांना बिसेन यांच्या घरासमोर बिबट्या दिसला.

       अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे काही क्षण परिस्थिती तणावपूर्ण झाली. बिबट्या हळूहळू त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजामुळे बिबट्या सिंधु भवन रोडच्या दिशेने वळला व तेथे काही वेळ थांबून निघून गेला.

         प्रसंगावधान राखत अमान कुरेशी यांनी तातडीने दुचाकी घराजवळ आणून सुरक्षितपणे आत प्रवेश केला व नगर सेवक युनूस शेख यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर दोघांनी टॉर्चच्या सहाय्याने परिसरात शोध घेतला; मात्र बिबट्या सिंधु भवनकडे निघून गेल्याचे आढळले.

         या घटनेमुळे साई नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच वनविभागाला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

         साई नगरातील सर्व मित्र, भाऊ-बहिणींनी सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे.