Home Political नगरपंचायत प्रभाग १६ पोटनिवडणुकीसाठी दोन महिला उमेदवारांचे नामांकन… — भाजप-काँग्रेसमध्ये थेट...

नगरपंचायत प्रभाग १६ पोटनिवडणुकीसाठी दोन महिला उमेदवारांचे नामांकन… — भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत, २० जून रोजी मतदान…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        शहरातील नगरपंचायत प्रभाग क्रमांक १६ तत्कालिन नगर सेविका गौरी ऊईके यांचे निधनानंतर झालेल्या रिक्त जागेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

         अनुसूचित जमाती (स्त्री) प्रवर्गासाठी राखीव असलेला हा प्रभाग मागील दोन वर्षांपासून रिक्त होता. नगरपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यासाठी अवघे सहा महिने शिल्लक असल्याने विजयी उमेदवाराला मर्यादित कालावधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिक व उमेदवारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून येत नसला, तरी आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षीय ताकद दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

        भाजपकडून माजी आमदार कृष्णा गजबे,शिंदे सेनेचे सुरेंद्रसींह चंदेल,प्रथम नगर अध्यक्ष डॉ.महेंद्र मोहबंसी व भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या उपस्थितीत निलीमा जयराम हारामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे व महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा आशाताई तुलावी यांच्या उपस्थितीत प्रतिभा रवि उईके यांनी नामांकन सादर केले.