दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील वेदमूर्ती ओंकार सुनील कुलकर्णी यांना वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ज्योतिष भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योतिष क्षेत्रातील अभ्यास, संशोधन व जनजागृतीबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत जोशी, डॉ.कुलभूषण मंगळे, वेदमूर्ती भूषण रमेश महाजन तसेच पंचांगकर्ते हर्षद महाजन यांच्या हस्ते कुलकर्णी यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ओंकार सुनिल कुलकर्णी म्हणाले, “ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे माध्यम नसून भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा सखोल अभ्यास करून समाजापर्यंत त्याचे शास्त्रोक्त ज्ञान पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
मिळालेला हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढविणारा असून भविष्यातही संशोधन व जनप्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे.” या पुरस्कारामुळे आळंदीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध स्तरांतून कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.



