दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीवर्षानिमित्त तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ४५० व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीतील श्री विठ्ठलधाम, खिसचेम येथे दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संतांच्या विचारांचा व साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा, या उद्देशाने हा सोहळा होत असून देहू व आळंदी येथील संस्थानचे विश्वस्त आणि वारकरी १६ एप्रिल २०२६ रोजी जर्मनीकडे रवाना होणार आहेत. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलधाम येथे भगवान विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच ‘नमो ज्ञानेश्वरा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तथा कीर्तनकार डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे यांचे इंग्रजीतून कीर्तन होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२ ते १२.३० या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीपूर्वक पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संत परंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार होण्यास चालना मिळणार असल्याची भावना वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहे.



