प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारतीय नागरिकांचे त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रामध्ये स्थान अस निर्माण झाल पाहिजे की,त्या क्षेत्रात त्यांना पर्याय नसला पाहिजे.आपली जागा कुणालाच भरून काढता न येणारी असावी,असे आपले काम व कौशल्य असले पाहिजे,असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय नागरिकांप्रति होते.
अगदी अशाच प्रकारे संविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी मोजक्याच दिवसात आपल्या कार्याची अशी चुणूक दाखवली होती,सर्वांच्या लक्षात आले होते की,संविधान सभेतील आंबेडकरांच्या कार्याला पर्याय नाही,म्हणून जगमान्य प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेबांना संविधान सभेत टिकवून ठेवणे काँग्रेसला अपरिहार्य वाटले.
३० ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेच्या घटना मसुदा समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
संविधान सभेतील १७ डिसेंबर १९४६ च्या भाषणात भारतातील परिस्थिती,राष्ट्रीय एकात्मता आणि जगातील भारताच्या स्थानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”आज आपण सामाजिक,राजकीय व आर्थिकदृष्ट्या विभागलेलो आहोत,याची मला जाणीव आहे.तद्वतच आपण एक दुसऱ्याविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत.
हे सर्व खरे असले तरीही मला पूर्ण खात्री आहे की,अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही.”
संविधान सभेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने घटनेचा निर्माता सापडला होता.देशाच्या परिस्थितीचे तंतोतंत आकलन असणारी व त्या दृष्टीने सर्वसमावेशक अशी योजना सुचविणारी व्यक्ती घटना समितीस मिळाली होती.त्यांचे प्रामाणिक व मुत्सद्दीपणाचे भाषण ऐकून संपूर्ण सभाच भारावून गेली.त्यांच्या भाषणाचे कौतुक नंतर कितीतरी वेळ टाळ्यांच्या गजरात होत राहिले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशात पेरलेली समता,स्वातंत्र्य आणि बंधुभाव याबाबत बोलताना बाबासाहेब म्हणतात,”या तीनही गोष्टी एकमेकांस जोडल्या आहेत.एकास वगळून तुम्हाला दुसरी साध्य करता येणार नाही.
स्वतंत्र भारतात घटनेच्या अंमलबजावणीनंतर होऊ घातलेल्या सामाजिक,राजकीय विसंगतीवर बोलतांना ते म्हणतात की,”आपण जर अधिक काळ सामाजिक जीवनात समता नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.”
भारत निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मते,संविधान देशाला यंत्रणा निर्माण करून देते,मार्गदर्शक तत्वे घालून देते.पण ही यंत्रणा चालवण्यासाठी ती चालविणारे लोक कोणत्या मार्गाचा अवलंब करतील यावर घटनेचे भविष्य अवलंबून आहे.
महातत्वज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच राजकीय पक्षांच्या विचारसरणीवर चिंता व्यक्त करतात.ते म्हणतात,”जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल.
पुढे ते म्हणतात,”आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय नागरिकांनी,सत्ताधाऱ्यांनी निर्धार केला पाहिजे.”
इशारा देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय नागरिकांना व सत्ताधाऱ्यांना सांगतात,”धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल,”परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.”
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणातील हे मुद्दे जर वाचले तर लक्षात येतं की,बाबासाहेबांचे देशाविषयीचे धोरण राष्ट्रीय एकात्मतेचे,राष्ट्रहिताचे आणि मानवीमूल्य जपणारे सर्वसमावेशक होते.तसेच भविष्यात राजकीय पक्ष देशापेक्षा आपली पक्षाची भूमिका,तत्त्वप्रणाली व हित महत्त्वाचे मानतील तर देशाचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल,हे युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच स्पष्ट करतात.
तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुढे सांगतात की,”राजकारणातील नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही संपूर्ण राष्ट्राला हुकूमशाहीकडे घेऊन जाणारी असेल.”आज आपण देशाची अवस्था पाहत आहोत,तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दुरदृष्टिकोनाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
कोणताही पक्ष किंवा कोणत्याही नेत्याचे जेव्हा देशात व्यक्तीपूजेचे स्तोम माजते, तेव्हा देश आपोआप हुकूमशाहीकडे चाललेला दिसून येतो. जगातील अनेक राष्ट्रांच्याबाबतीत हेच झाल्याचे दिसून येत आहे, म्हणून याबाबतचा सावधानतेचा इशारा बाबासाहेबांनी संविधान देशाला सुपूर्द करतानाच दिलेला आहे. हे सर्व भारतीयांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
आज भारत देशांमध्ये हजारो जाती,धर्म,पंथ,वेगवेगळ्या भाषा,रुढी व परंपरा अशा अनेक विविधता असणारे लोक एकत्रितपणे देश म्हणून जेव्हा राहतात आणि प्रगती करतात,तेव्हा लक्षात येते की,या देशाची घटना,वा देशाचे कायदे महान आहेत.कारण सन १९५० पासून देशाने जी प्रगती साध्य केलेली आहे,ती प्रगती संविधानाच्या जोरावरच साध्य करता आलेली आहे.
संविधानाचे महत्त्व आणि संविधानाची लवचिकता लक्षात घेता,सागावसे बाटते की,भारतीय संविधानाचे महत्त्व हे आहे की,हे संविधान या देशातील कोणत्याही माणसाला संविधानावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार देते.या देशातील कोणत्याही माणसाला संविधानाची समीक्षा करण्याचा अधिकार देते.या देशातील कोणत्याही माणसाला हे संविधान स्वतःची शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक प्रगती साधण्याचा अधिकार देते,देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मताचा अधिकार देते आणि त्याचबरोबर अगदी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवण्याचा आणि लोकशाही मार्गाने ते पद मिळवण्याचा अधिकार देते.
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक हे खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे.
सामाजिक,आर्थिक आणि राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ति,विश्वा,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय यासह प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे हक्क आणि अधिकार देणारे परिपूर्ण संविधान निर्माण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
संविधान सभेचे काम मोजून दोन वर्ष ११ महिने १८ दिवस चालले.परतु हे संसदीय कामाच्या वेळेनुसार मोजले गेलेले दिवस होते,तर संविधान निमति डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या काळात संविधानाच्या कार्यासाठी स्वतःला अहोरात्र वाहून घेतलेलं होतं.
अशाप्रकारे स्वतःच्या आरोग्याची,जीवाची तमा न बाळगता डाॅ.बासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीचे धनुष्य पेलले होते आणि भारताला जगातील सर्वोत्तम महान संविधान दिले आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर…..
आजही हा विचार जरी मनात आला तरी,अंगावर काटा येतो.मनात अन् मेंदूत विचारांचं आणि प्रश्नांचं वादळ उठतं.कुणी दिला असता पिढ्यान् पिढ्या पिचलेल्या या अस्पृश्याना न्याय? वर्षानुवर्षे कुणाला कळल्या होत्या आणि आजही कुणाला कळल्या असत्या या दीनदुबळ्यांच्या वेदना? कुणाला वाटत होत की,या वेशीबाहेरच्या माणसांच्या हाती याव्यात सत्तेच्या चाव्या? अन् कुणाला वाटलं असतं की,काल जोहार करणारा उद्या साहेब व्हावा,कलेक्टर हावा? अधिकार देऊन कुणी उघडली असती बाईसाठी,आईसाठी,ताईसाठी राष्ट्रपतीपदांची दारं? अन् कशी झाली असती मंत्री,आमदार,खासदार गावकुसाचाहेरची पोरं?
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब तिथं नसतेच तर इंडियात नसता दिसला भारत!,अन् गावाच्या सीमाही न ओलांडणारा बसला नसता देशोदेशी फिरत.
समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष नसते तर कोण म्हणालं असतं,”आदिवासींनो,शहराकडे चला! कुणी दिला असता ओबीसी प्रवर्गाला जन्म!,अन् कोण धावला असता कामगारांसाठी? कोण उभा राहिला असता समान वाटा देऊन साऱ्या बहिणींच्या पाठीसी?
हे प्रश्न मनाला विचारले तर,भारत देशाच्या पृथ्वीतलावर भारतीय संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला नसता तर,”या देशातील महिला/पुरुष,युवकयुवती,विद्यार्थी,कामगार (कामगारात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे),बेरोजगार,हे गुलामच असते!…
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला भारत देशातील समस्त मुलं निवासी नागरिकांनी,(महिला/पुरुषांनी) वेळ न दवडता वेळीच समजून घेतले पाहिजे व स्वतःला वेळीच सावरले पाहिजे…
(मुल निवासी म्हणजे ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक आणि इतर)
यातच त्यांचे स्वातंत्र्य,अभिमत्व,अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडलेले आहे.


