रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील सामान्य कुटुंबात राहणारी कु. वृषाली प्रकाश दिघोरे हिने अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत चंद्रपूर पोलीस पदी निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शंकरपूरसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वाजत-गाजत मिरवणूक काढत तिच्या यशाचा जल्लोष केला.
वृषालीचे कुटुंब सर्वसामान्य परिस्थितीत जीवन जगत असताना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचा प्रवास तिने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर पूर्ण केला. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडथळे असतानाही तिने आपले ध्येय कधीही डोळ्याआड होऊ दिले नाही.
नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने यश संपादन केले.2022 ते 2026 पर्यंत तिने होमगार्ड पदावर काम केले व सोबत पोलीस भरतीची तयारी सुरु ठेवली वृषालीची निवडीची बातमी समजताच शंकरपुर मध्ये आनंदाची लाट उसळली. परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि युवकांनी एकत्र येत तिच्या घरापासून शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
यातच भाजपा नेते तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतिश भाऊ वारजुकर यांनी त्यांच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन करत शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचाली साठी तिला शुभेच्छा दिल्या या वेळी माजी पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक, कपिल बघेल उपस्थित होते.



