Home Maharashtra बिनबुडाच्या आरोपांचे खंडन नमो उद्यान व आंबेडकर पार्क प्रस्तावांना मंजुरी… —...

बिनबुडाच्या आरोपांचे खंडन नमो उद्यान व आंबेडकर पार्क प्रस्तावांना मंजुरी… — सुधाकर पाटील भारसाकळे यांची पत्रकार परिषदेत माहिती…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक  

          दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांकडून करण्यात आलेल्या बिनबुडाच्या आरोपांचे जोरदार खंडन केले. शहरातील विकासकामांबाबत दिशाभूल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा पलटवार त्यांनी केला.

          पालिकेच्या बैठकीत नमो उद्यानासाठी सुमारे 1 कोटी रुपयांच्या कामास एकमताने मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील विकासकामांचा ठरावही पारित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव जपत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

         विरोधकांकडून निगेटिव्ह प्रचार करून काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करत, हा मोठा षडयंत्राचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर पक्षाची आचारसंहिता लागू होईल व गरज पडल्यास अपात्रतेची कारवाईही केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच अशा व्यक्तींविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल, असेही स्पष्ट केले.

         दर्यापूर शहरात काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नसून सर्व नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रखडलेली भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

         या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तसेच तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        पत्रकार परिषदेनंतर नगरसेवक रामेश्वर तांडेकर , माजी नगरसेवक शिवाजी देशमुख यांच्या वडिलांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.