राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कूरखेडा नगर पंचायत अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटा गाड्यांच्या डिझेल टाकीत अज्ञात व्यक्तींनी साखर टाकल्याची धक्कादायक घटना समोर आल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकारामुळे मागील पाच ते सहा दिवसांपासून न.प.च्या घंटा गाड्या बंद अवस्थेत असून शहरातील कचरा संकलन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
घंटा गाड्या बंद असल्याने विविध वार्डांमध्ये कचऱ्याची उचल झाली नसून नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच नगर पंचायत प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून नियमित कचरा संकलन सुरू करावे,अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.



