Home देशविदेश धर्म म्हणजे राष्ट्र नव्हे…

धर्म म्हणजे राष्ट्र नव्हे…

     धर्म ही एक व्यापक संकल्पना आहे,आणि राष्ट्र ही एक सीमित संकल्पना आहे.राष्ट्राला देशाची सीमा असते,आणि धर्माला देशाची सीमा नसते,तर धर्म विश्वव्यापी संकल्पना आहे.

        राष्ट्र या संकल्पनेत राष्ट्रातील जनतेची नागरिकांची एकता आणि एकात्मकता,समरसता,बंधुत्व,सर्वधर्म समभाव,जातीय सलोखा,जाती धर्म निरपेक्षता या गोष्टी,हे विचार समाविष्ट आहेत,धर्मात पण या गोष्टीना महत्व आहे,पण या विचाराची व्याप्ती ही अमर्याद आहे.म्हणजे देश राष्ट्र या विचाराला छेद देत पुढे जाऊन विश्वात्मक होणारी आहे.

         राष्ट्रात अखिल मानव जातीचे विभाजन दिसून येते,अखिल धर्माचे विभाजन दिसून येते.पण धर्म या संकल्पनेत भेद रेषाच नसते.दया क्षमा शांती,सत्य न्याय नीती या मूल्यावर धर्माची पायाभरणी झालेली असते.तरी व्यापक अशा या धर्म संकल्पनेला छेद देत,अनेक संप्रदाय जगाच्या पातळीवर निर्माण करण्याचे पाप स्वार्थी लोक करताना दिसतात.

         धर्माला जातीची देशाची राष्ट्राची भाषेची,वंशाची,लिंगभेद ची म्हणजेच कोणतीच मर्यादा नाही.भेद नाही.भेदाभेद विरहित धर्म असतो,मर्यादा विरहित धर्म असतो,म्हणून हे राष्ट्र हिंदूचे,ते राष्ट्र मुस्लिमांचे,ते राष्ट्र ख्रिश्चनाचे,बौद्धांचे असे राष्ट्रांचे धार्मिक विभाजन करणे हे संकुचित आणि शूद्र विचाराचे,अपवित्र अशुद्ध विचाराचे लक्षण समजावे.धार्मिक राष्ट्र निर्माण होऊच शकत नाही.कारण धर्माला राष्ट्राच्या देशाच्या सीमेत बंधनात सिमित करता येत नाही.असे करणे म्हणजे वेडेपणाचे ,स्वार्थाचे ,अव्यवहार्य लक्षण आहे.कारण ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला,त्या त्या देशात अशांती आणि हिंसा बोकाळलेल दिसते.ते राष्ट्र स्थिर राहूच शकत नाहीत,देशांतर्गत धर्मांतर्गत हिंसा मोठ्या प्रमाणात घडताना दिसते.म्हणूनच कुणीही आपल्या राष्ट्राला धार्मिक राष्ट्र म्हणून घोषित करण्याची चूक करू नये.धर्माचा जन्मच मुळी हिंसा रोखण्यासाठी झालेला आहे.हे लक्षात घेऊन धर्माला च हिंसाचारी बनविण्याचे पाप करु नये.

    माणूस ‘ ही एक जात आहे,माणुसकी हा व्यवहार आहे,माणुसकी हा धर्म आहे,या त्रिसूत्री नुसार सारे देश चालले तर ” विश्व हेच माझे घर,कुटुंब बनेल.” विकृतीचे सारे साखळदंड गळून पडतील,साऱ्यांनाच मुक्त श्वास घेता येईल.

      लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

              फोन : 9420912209