युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या सेवा अधिक सुलभ व्हाव्यात या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर तहसिल कार्यालयाजवळील शासकीय इमारतीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे भाडेतत्त्वावर असून शहराच्या एका टोकाला स्थित आहे. त्यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या शेतकरी बांधवांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश शासकीय कार्यालये अमरावती रोड परिसरात व तहसिल कार्यालयाजवळ असल्याने नागरिकांची वर्दळ त्या ठिकाणी अधिक असते.
याच पार्श्वभूमीवर, तहसिल कार्यालयाजवळील महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाची सध्या रिक्त असलेल्या इमारतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर केल्यास सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल आणि प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख होईल.
या मागणीसंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितिन पाटील गावंडे, नगरसेवक राहुल बैताडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर मागणीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत असून प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय गरज आहे.



